विधिमंडळातील युवा सदस्यांनी शिक्षण, रोजगार यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करावे : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

राष्ट्रकुल संसदीय मंडळ विभाग – 7 च्या पणजी वार्षिक परिषदेत विकसित भारत – 2047 चे उद्दीष्ट साध्य करतांना विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका आणि व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण, तटीय संपर्कयंत्रणा यासाठी क्षेत्रीय प्राधान्यक्रम या विषयांवर विचारमंथन
पुणे – विधिमंडळातील युवा सदस्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासाबरोबरच शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यांसारख्या व्यापक विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र – गोवा – गुजरात या विभाग – ७ च्या पणजी येथे आयोजित वार्षिक परिषदेमध्ये “विकसित भारत – २०२७ चे उद्दीष्ट साध्य करतांना विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका” या विषयावर ते बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 09 व 10 एप्रिल, 2026 रोजी ही परिषद पणजी येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यसभेचे उप सभापती हरिवंश सिंह, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे, महाराष्ट्रासह राज्य विधानमंडळांचे सदस्य उपस्थित आहेत. गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या परिषदेत आपले महत्वपूर्ण विचार मांडले.
महाराष्ट्र विधानसभा अण्णा बनसोडे यावेळी बोलतांना पुढे म्हणाले की, भारत हा जगात तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला देश आहे. लोकशाही प्रक्रियेत युवा आमदारांचा वाढता सहभाग ही सकारात्मक बाब आहे. तरुण सदस्यांनी सभागृहात सातत्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची एक आठवण मला इथे सांगावीशी वाटते. सभागृहात नवीन आलेल्या सदस्यांनी सभागृहाची बैठक सुरू झाल्यापासून ती संपेपर्यंत संपूर्ण दिवस सभागृहात उपस्थित रहायला हवे, असा त्यांचा नेहमी आग्रह असे. इतकेच नव्हे, तर ते स्वतः संपूर्ण वेळ सभागृहात उपस्थित राहात असत. असे केल्याने राज्यातील सर्व प्रश्नांची माहिती होते आणि त्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य जनतेचे, नव्या पिढीचे, युवकांचे प्रश्न सोडवता येऊ शकतात, अशी त्यामागे त्यांची भूमिका असे.
विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याकरिता नव्या पिढीतील आमदारांच्या भूमिकेचा विचार करताना एका अनुभवसंपन्न नेत्याच्या या विचारांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न नव्या सदस्यांनी करायला हवा, असे मला वाटते. शिक्षण आणि कौशल्य विकास हा विकसित भारताचा पाया असल्याचे नमूद करत, शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युवा लोकप्रतिनिधींनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शाश्वत विकासाची गरज अधोरेखित केली. हरित ऊर्जा, जलसंधारण आणि प्रदूषणमुक्त विकास यावर भर देत पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्यासाठीची आवश्यकता असल्याचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले.



