गुजरातमधील शाळेत भरवण्यात आली ‘माझा आदर्श नथुराम गोडसे!’ स्पर्धा

वलसाड : गुजरातमध्ये ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची घटना घडली आहे. गुजरात सरकारच्या युवक सेवा व सांस्कृतिक खात्याने बाल प्रतिभा शोध स्पर्धा आयोजित केली होती. या अंतर्गत वक्तृत्व व अन्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ही स्पर्धा वलसाड जिल्ह्यातल्या कुसुम विद्यालयात झाली.

ही स्पर्धा 5 वी ते 8 वी वर्गांसाठी होती. त्यात 25 सरकारी शाळा व खासगी शाळांनी भाग घेतला होता. 14 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रकरणी नीताबेन गवळी या शिक्षण विकास अधिकाऱ्याला राज्य सरकारने सेवेतून निलंबित केले आहे.



कुसुम विद्यालयाच्या संचालिका अर्चनाबेन देसाई म्हणाल्या, ही स्पर्धा जिल्ह्यात बाल प्रतिभा संशोधन उपक्रमांतर्गत आयोजित केल्याचे सांगितले. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन शासकीय जिल्हा क्रीडा कार्यालयाने तयार केले होते. अशा परिस्थितीत आमच्या शाळेने केवळ स्पर्धेसाठी जागा दिली आणि वलसाडच्या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या आदेशाचे पालन केले, असे म्हणता येईल. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आम्हाला त्याचे विषय सांगण्यात आले नव्हते. अर्चनाबेन पुढे म्हणाल्या की, स्पर्धेच्या अवघ्या 24 तास आधी शाळेला या स्पर्धेची माहिती देण्यात आली होती. यामध्ये ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ याशिवाय ‘मला आकाशात उडणारे पक्षी आवडतात’ आणि तिसरा ‘मी शास्त्रज्ञ होऊनही अमेरिकेला जाऊ नये’ असे तीन विषय ठेवण्यात आले होते. या तिन्ही विषयांवर मुलांनी मनोगत व्यक्त केले.
नथुराम गोडसे या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी नाराजी व आश्चर्य व्यक्त केले. या नाराजीनंतर स्पर्धा आयोजकांनी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या मुलाकडून बक्षीस पुन्हा मागितले.
या घटनेनंतर विजेत्या विद्यार्थ्याचे पालकांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले होते. विजेत्या विद्यार्थ्याने आपण ‘नथुराम गोडसे आपला आदर्श आहे’, या विषयावर खूप मेहनत घेतली होती असे सांगितले. माझ्या शिक्षकांनी या विषयाची माझ्याकडून तयारी करून घेतली होती. असा पुरस्कार परत मागणे योग्य नसल्याचे या विद्यार्थ्याचे म्हणणे होते. पुरस्कार परत देताना या विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणीही आले होते. वलसाड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी बी. डी. बाराईया यांनी अशी स्पर्धा आहे, याची मला कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
वलसाडच्या जिल्हाधिकारी क्षिप्रा आग्रा म्हणाल्या, हे प्रकरण क्रीडा विभागाच्या अखत्यारीत येत आहे, त्यामुळे केवळ क्रीडा विभागच याबाबत कारवाई करेल. ते माझ्या अधिकारक्षेत्रात येत नाही.



