पुणे शहर

गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घ्यावा : पोलीस उपायुक्त चुलूमुला रजनीकांत

” कायद्याचे पालन करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा – पोलीस उपायुक्त चुलू्मुला रजनीकांत यांचे आवाहन. फुलेनगर परिसरातील नागरिकांशी सलोखा बैठकीच्या माध्यमातून संवाद

पुणे – समाजातील गुन्हेगारी तसेच उपद्रवी घटकांना रोखण्यासाठी पोलिसांसोबत नागरिकांनी देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त चुलूमुला रजनीकांत यांनी केले. यासाठी आपल्याला घरापासून सुरुवात करावी लागेल. आपल्या मुलांसोबतच इतरांना देखील कायद्याचे पालन करण्यासाठीची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर या पुढील काळात कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस उपायुक्त रजनीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Img 20260222 wa00064282746827061526116

फुलेनगर ज्येष्ठ नागरिक संघ येथे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन आयोजित “सलोखा बैठक” कार्यक्रमात पोलीस उपायुक्त रजनीकांत यांनी नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे, नगरसेविका शितलताई सावंत, फुलेनगर सोसायटीचे अध्यक्ष उमेश माने, हनुमान मित्र मंडळाचे सुरेश नायर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मजहर खान, घरोंदा सोसायटीचे अशोक काळे, सामाजिक कार्यकर्त्या शिवानी माने, यशवंत सांगळे,शांतता कमिटीचे सदस्य निखिल गायकवाड यांच्यासह फुलेनगर परिसरातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी नागरिकांनी प्रामुख्याने फुलेनगर परिसरातील बाहेरच्या तरुणांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार केली. मोठ्या आवाजात स्पीकर वाजवणे, बुलेट गाड्यांचे आवाज करणे, रात्री उशिरापर्यंत वाढदिवस साजरे करणे, गोंधळ घालून शिवीगाळ करणे अशा अनेक स्थानिक समस्या यावेळी नागरिकांनी सांगितल्या. परिसरातील शाळेच्या आवारातील बंद जिम, बुद्ध विहार, सर्वे ऑफ इंडिया गेट, म्हाडा कॉम्प्लेक्स, गार्डन चा परिसर, हनुमान मंदिर, रमाबाई वसाहत या भागात प्रामुख्याने टोळकी उभी राहून रात्री उशिरापर्यंत गोंधळ करत असतात. या सर्व ठिकाणी आगामी काळात मोठ्या प्रमाणावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त रजनीकांत यांनी स्पष्ट केले.

रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पानटपऱ्या हॉटेल यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. फुलेनगर व परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा सुसज्य करण्यात यावी तसेच नागरिकांनी तातडीचे वेळी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक (112) ची मदत घ्यावी. या सर्व परिसरातील पोलीस गस्त वाढवण्यात येणार असून महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या घरातील मुले वेळेवर घरात येतील याची दक्षता घ्यावी. रात्री अकरानंतर रस्त्यावर अनावश्यक थांबणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेविका शितलताई सावंत यांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती प्रशासनाकडील जबाबदारी पार पाडण्यात येईल असे सांगितले. ज्येष्ठ नागरिक महिलावर्ग यांना होणाऱ्या गंभीर त्रासापासून पोलिसांनी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी विनंती यावेळी त्यांनी केली. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. नागरिकांनी कोणत्याही अडचणीच्या काळात तात्काळ पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी केले, सूत्रसंचालन निखिल गायकवाड यांनी तर आभार पोलिस अंमलदार गणेश पारडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये