आवड अन् क्षमतेवर क्षेत्र निवडल्यास आव्हाने सोयीस्कर; दिलीप वेडेपाटील फाऊंडेशनच्या कार्यक्रमात विवेक वेलणकरांचे मत

पुणे : विद्यार्थ्यांनी पुढील 3 ते 6 वर्षांनंतर संबंधित क्षेत्रात नेमकी काय स्थिती असेल, याचा अंदाज घेऊन आपली आवड आणि क्षमता लक्षात घेऊन क्षेत्र निवडा मात्र, आपल्याला आवडलेल्या विषयांशी संबंधित कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करू शकतो, कोणत्या शाखेतून शिक्षण घेणे आपली जमेची बाजू ठरेल, या गोष्टींचा विचार करून प्रवेशासंबंधित निर्णय घेणे योग्य ठरेल. कोणतेही क्षेत्र निवडले तरी कष्टाला पर्याय नाही असे परखड मत विवेक वेलणकर यांनी व करिअर मार्गदर्शन करताना केलं.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने खडकवासला विधानसभा मतदार संघातील ‘गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष धीरज घाटे, खडकवासला विधानसभा (पु.) सचिन मोरे, माजी नगरसेविका राजश्रीताई नवले,जयश्रीताई पोकळे, किरण बारटक्के, सारंग नवले ,बाळासाहेब नवले, वृषाली चौधरी, प्रसन्न जगताप,निता दांगट,अश्विनी पोकळे, सुरेंद्र कंधारे,नवनाथ तागुंदे,सचिन वि. दांगट, गणेश गवांडे,राजेश मनगिरे, कृष्णा भंडारी, शरण कोळी, नितीन दगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

विवेकजी वेलणकर म्हणाले की, दहावी-बारावीनंतर विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अर्थशास्त्र, विधि, डिझायिनग, अॅनिमेशन, परदेशी भाषांचे शिक्षण या काही क्षेत्रांत चांगल्या मनुष्यबळाची गरज नेहमीच असते. संज्ञापन क्षेत्रात ‘समाज माध्यम व्यवस्थापन’ असे नवे क्षेत्र तयार झाले आहे, त्यातही मनुष्यबळाची गरज वाढणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी अकरावी, बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण घेऊन नंतर प्रवेश परीक्षा देऊन पदवीला प्रवेश घेता येतो. तसाच अभियांत्रिकी पदविकेचाही मार्ग आहे. दहावीनंतर तीन वर्षे पदविका आणि त्यानंतर अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्षांला थेट प्रवेश घेऊन पुढे तीन वर्षे पदवीचे शिक्षण घेता येते. यापैकी कोणता मार्ग निवडायचा? याबाबत अनेकांचा गोंधळ होतो. या दोन्हींचे फायदे-तोटे आहेत. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर प्राधान्याने कला किंवा वाणिज्य शाखेची निवड करणे योग्य. संरक्षण सेवेत कायम वेगवेगळय़ा पातळीवर संधी आहेत. त्यासाठी प्रवेश परीक्षा असते. मात्र, संरक्षण सेवेच्या प्रवेश परीक्षा देण्यासाठी कोणत्याही शाखेत गणित विषय निवडावा. संरक्षण, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय या क्षेत्रांतही चांगली संधी आहे.
पदविकेला प्रवेश घेतल्यास बारावीनंतरच्या प्रवेश परीक्षा, त्याच्या शिकवण्या हे टाळता येऊ शकते. पदविका प्रवेशाचे तोटेही आहेत. दहावीनंतरच पदविकेसाठी शाखा निवडावी लागते. त्यात गोंधळ होण्याची शक्यता असते. बारावीनंतर पदवीला प्रवेश घेताना उपलब्ध जागांची संख्या अधिक असते. मात्र, पदविकेनंतर द्वितीय वर्षांसाठी प्रवेश घेताना जागा कमी असतात. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी चुरस रंगते. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान त्या महाविद्यालयातून प्लेसमेंट होतात का? या मुद्दय़ाकडे विशेष लक्ष देऊन महाविद्यालयाची निवड करावी. तसेच आपण निवडलेल्या महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट द्या आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांशी चर्चा करा. विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि नावड तसेच करिअरच्या संधींचा भविष्यवेध घेऊन अभ्यासक्रमाची निवड करावी असे आवाहनही विवेक वेलणकर यांनी केले.



आजपर्यंत तरुणांच्या ‘भविष्य निर्मिती’च्या उपक्रमात विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले आहे. कायम राजकारण करण्यापेक्षा भावी पिढी च्या भविष्यासाठी आपले राजकीय आयुष्य कामे लावण्याचे काम केले असून खडकवासला मतदारसंघातील या भावी पिढीच्या भवितव्याचं रक्षण दर्शन आणि संवर्धन करण्यासाठी आपले आयुष्य कटिबद्ध असल्याचे माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी सांगितले. या स्तुत्य उपक्रमासाठी चंद्रकांतदादा पाटील, मेधा कुलकर्णी, प्रदीप रावत यांच्या मार्गदर्शनाखाली व मुरलीधर मोहोळ यांचे शुभ संदेश कायमच पाठीमागे असून भारतीय जनता पक्षाचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत असताना त्याच घरातील तरुणांचे भविष्यही सुरक्षित करणे ही पक्षाची भूमिका असल्याचेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.






