पुणे शहर

डीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा-राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सर्व गणेश मंडळांना आवाहन

कोरोना काळातील गणेश मंडळांच्या सकारात्मक भूमिकेचीही आठवण

पुणे : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या उत्सवातील भक्ती, श्रद्धा आणि मांगल्य टिकवून ठेवताना नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी डीजे आणि लेझर बीमचा वापर टाळून कायद्याचे पालन करत उत्सव साजरा करावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून पुणेकरांना केले आहे.

गणेशोत्सवात पूर्वी काही अनुचित प्रथा शिरल्या होत्या. त्या दूर करून भक्ती आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यातूनच ढोल-ताशा पथके आणि गणेश मंडळांसमोर सामुदायिक अथर्वशीर्ष पठणासारख्या चांगल्या प्रथा रुजल्या, असे पाटील यांनी पत्रकात नमूद केले.

Img 20260222 wa00064513382578852640289

लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन, लोकहित आणि राष्ट्रहिताच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची आहे. डीजे आणि लेझर बीमच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिक, रक्तदाबाचे रुग्ण, लहान मुले तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या वापराला भक्तिभावाने काम करणारा कोणताही संवेदनशील गणेश मंडळाचा कार्यकर्ता पाठिंबा देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“डीजे हवाच” असा आग्रह धरणारे मोजके लोक आहेत. गणेशोत्सव म्हणजे डीजे, अशी भ्रामक कल्पना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नाही. गणेश मंडळांचा कार्यकर्ता हा समाजाचाच घटक असल्याने डीजे आणि लेझरमुळे होणारा त्रास त्यालाही चांगल्या प्रकारे समजतो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळातील गणेश मंडळांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेची ही पाटील यांनी पत्रकामधून आठवण करुन दिली आहे. कोरोना काळात गणेश मंडळांनी सरकारने घातलेले निर्बंध स्वीकारले. पुण्याची ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक रद्द करण्याचा निर्णयही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी जड अंतःकरणाने स्वीकारला. त्याचप्रमाणे आता निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

कायद्याने घातलेल्या बंधनांचा सन्मान करणे गरजेचे असून, गणेशोत्सवाची आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली सकारात्मक प्रतिमा कायम राखण्यासाठी नकारात्मक बातम्या जगभर जाणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी. उत्सवातील उत्साहाला बांध नसावा; मात्र त्याचा नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

“पुणेकरांच्या हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी भरता कामा नये. भक्ती, सामाजिक जाणीव आणि कायद्याचा सन्मान राखून गणरायाचा उत्सव उदंड उत्साहाने साजरा करूया,” असे आवाहन पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये