नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापौर आणि आयुक्तांना वॉटर प्युरिफायर भेट देत निषेध नोंदविला.खडकवासला धरणात दूषित सांडपाणी मिसळण्याचा गंभीर मुद्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी

पुणे : पुणे शहराच्या मुख्य पाणीपुरवठ्याचा आधार असलेल्या खडकवासला धरणात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा गंभीर मुद्दा आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) या प्रश्नावर जोरदार आवाज उठवत महापौर आणि आयुक्त यांना प्रतीकात्मक स्वरूपात वॉटर प्युरिफायर भेट देऊन तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेते निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अमोल बालवडकर आणि पक्षीय सहकारी नगरसेवकांनी मुख्य सभेत हा मुद्दा उपस्थित केला.

नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, खडकवासला धरणाच्या जलस्रोतांमध्ये परिसरातील गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी, कुडजे आदी गावांमधील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांमधून प्रक्रिया न केलेले दूषित सांडपाणी थेट मिसळत आहे. याबाबत मी यापूर्वी ड्रोन व्हिडिओद्वारे पुरावाही सादर केला होता.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
पुणेकरांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. मात्र, धरणात दूषित पाणी मिसळल्याने शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होत असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे विरोधकांनी सभेत सांगितले. “हवा प्रदूषित, आता पाणीही दूषित… पुणेकरांनी श्वास घ्यायचा कसा, प्यायचं काय आणि जगायचं तरी कसं?” असा सवाल अमोल बालवडकर यांनी यापूर्वीही उपस्थित केला होता.
नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले, “पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ थांबवा. शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी पार पाडा. आश्वासनांची गरज नाही, तातडीची कृती हवी. शुद्ध पाणी हा पुणेकरांचा हक्क आहे आणि त्यासाठी आवाज उठवणे हे आमचे कर्तव्य आहे.”
विरोधकांच्या मुख्य मागण्या
राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका प्रशासनाकडे खालील ठोस मागण्या केल्या आहेत –
खडकवासला धरणात मिसळणाऱ्या दूषित सांडपाण्याचा स्रोत तातडीने शोधून तो बंद करावा.
पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाण्याची खात्री द्यावी.
दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, यासाठी तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
दोषी व्यावसायिक आस्थापनांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी.
धरण परिसरात नियमित गस्त घालून सांडपाणी कुठून आणि कसे सोडले जाते, याची सखोल तपासणी करावी.
संबंधित व्यावसायिक आस्थापनांना सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उभारणे बंधनकारक करावे. तसेच ग्रामपंचायतींना STP उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
प्रतीकात्मक निषेध
मुख्य सभेत विरोधकांनी महापौर आणि आयुक्तांना वॉटर प्युरिफायर भेट देऊन निषेध नोंदविला. यावेळी भाजपनेही पालकमंत्र्यांना फिल्टर भेट देण्याची सूचना केल्याची माहिती समोर आली आहे.
खडकवासला धरण परिसरातील अनियंत्रित विकास, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडण्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनीही याबाबत पूर्वीपासून महापालिकेकडे पत्रव्यवहार केल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही जलप्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा मुद्दा केवळ धरण परिसरापुरता मर्यादित नसून लाखो पुणेकरांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
महापालिका प्रशासनाने याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, विरोधकांनी सभेत स्पष्टपणे सांगितले की, आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रशासनाने तातडीने ठोस कृती करावी. शुद्ध पाण्याच्या प्रश्नावर पुणेकरांना दिलासा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असे त्यांनी आग्रहाने सांगितले.
या मुद्द्यावर पुढील कारवाईबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



