कोथरूड मध्ये नवरात्रीनिमित्त महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान..

‘स्वच्छता जिथे, तिथे लक्ष्मी नांदते’ या विचाराला कृतीची जोड.. महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून गौरव
पुणे : शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा नवरात्रीनिमित्त साडीचोळी देऊन आणि औक्षण करून सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास आयोजित या उपक्रमातून महिला सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ‘स्वच्छता जिथे, तिथे लक्ष्मी नांदते’ या विचाराला कृतीची जोड देत या महिलांना खऱ्या अर्थाने ‘नवदुर्गा’ म्हणून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला रो समीर कुलकर्णी , रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी डॉ. नीलम नितीन ढमाले, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या फर्स्ट लेडी अनघा कुलकर्णी आणि गेल्या सहा वर्षांपासून दिवाळीनिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किटचे वाटप करणाऱ्या अनुराधा वैद्य यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांचा नवरात्री सणा निमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, आरोग्य निरिक्षक करण कुंभार, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या महिला सभासद तसेच महानगरपालिकेचे मोकादम वैजीनाथ गायकवाड यांची या वेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे डायरेक्टर किरण इंगळे यांनी केले. शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यात महिला सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. नागरिकांना स्वच्छ परिसर मिळावा, यासाठी या महिला दररोज प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य पार पाडतात. त्यांच्या या कार्याची समाजाने दखल घेऊन त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे, अशी भावना या उपक्रमामागे असल्याचे त्यांनी सांगितले.
नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मात्र, आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या माध्यमातून समाजाचे आरोग्य जपणाऱ्या महिलांचाही सन्मान व्हायला हवा, या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. साडीचोळी भेट देऊन आणि औक्षण करून या महिलांप्रती आदर व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाला सन्मानाची पोचपावती मिळाली.
सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेणे, हा रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुणे महानगरपालिकेचे मोकादम वैजीनाथ गायकवाड यांनी केले.
स्वच्छ शहराच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करत, त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा देण्याचा आणि समाजात कृतज्ञतेची भावना रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



