नवरात्रीनिमित्त महिला शक्तीचा सन्मान: नगरसेविका रूपाली पवार आणि साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने नऊ दिवस नऊ दुर्गा सन्मान सोहळा

पुणे : नवरात्री निमित्ताने ललिता पंचमीच्या मंगलदिनी स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात आला.स्व कर्तृत्वाने व्यवसायात यशस्वी झालेल्या 9 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. नवरात्री निमित्ताने सलग नऊ दिवस नऊ दुर्गा रूपांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जाणार आहे. नगरसेविका रूपाली सचिन पवार आणि साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
“जागर आदिशक्तीचा… सन्मान स्त्रीशक्तीचा! ” या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात स्वकर्तृत्वाने व्यवसायात यश मिळवणाऱ्या नऊ महिला उद्योजिकांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे. या महिलांना साक्षात महालक्ष्मीचे रूप मानून त्यांच्या जिद्दीला आणि आत्मनिर्भरतेला मनापासून सलाम करण्यात आला आहे.

नऊ दिवस, नऊ दुर्गा सन्मान
या सोहळ्यात ज्येष्ठ महिला सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. पुढील दिवसांत कोथरूड-बावधान क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, पोलीस कर्मचारी, पीएमपीएल कंडक्टर्स, वकील, शिक्षिका, खेळाडू तसेच घरकाम करणाऱ्या महिलांसह विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना त्यांच्या अथक परिश्रमासाठी आणि समाजातील योगदानासाठी गौरविण्यात येणार आहे.



नगरसेविका रूपाली सचिन पवार यांनी या उपक्रमाबाबत सांगितले, “स्त्रीशक्ती ही आदिशक्ती आहे. ललिता पंचमीच्या दिवशी आम्ही केवळ पूजा-अर्चा न करता प्रत्यक्ष समाजात कार्यरत असलेल्या महिलांना सन्मानित करत आहोत. सफाई कामगारांपासून डॉक्टर, शिक्षिका, उद्योजिका अशा सर्व स्तरांवरील महिलांचे योगदान अमूल्य आहे. या माध्यमातून आम्ही त्यांच्या आत्मविश्वासाला आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन देत आहोत.”



साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या निमित्ताने महिला उद्योजिकांच्या यशोगाथाही सादर केल्या जाणार असून, त्यांच्या अनुभव कथनातून इतर महिलांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ललिता पंचमीच्या पवित्र दिनी सुरू झालेला हा ‘नऊ दिवस नऊ दुर्गा सन्मान’ सोहळा पुणे शहरातील महिलांच्या कर्तृत्वाला नवी ऊर्जा देईल, अशी आशा व्यक्त करते.



