शिवस्फूर्ती प्रमाणे समाज प्रबोधन करणारे उपक्रम महापालिका राबवणार : उपमहापौर परशुराम वाडेकर

पुणे – शिवस्फूर्ती प्रतिष्ठान गेली १२ वर्ष सातत्याने बळीराजा महोत्सवाचे आयोजन करत आहे हे कौतुकास्पद आहे. आजच्या द्वेषपूर्ण वातावरणात बळीराजा व महापुरूषांच्या विचारांचा जागर होणे हे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे महात्मा फुले जन्मद्विशताब्दीचे औचित्य साधून ॲड. शारदा वाडेकर व ॲड .निशा चव्हाण यांना सन्मानित केले ही चांगली गोष्ट आहे. यावर्षात पुणे मनपाच्या वतीने सुध्दा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, असे प्रतिपादन उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले. विचारपीठावर ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते अंकल सोनवणे, पुणे मनपाचे निवृत्त अति. आयुक्त व प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त संदीप कदम, ॲड. शारदा वाडेकर, ॲड. निशा चव्हाण व ॲड. शैलजा मोळक उपस्थित होते.

महाराष्ट्राची लोककला, लोकपरंपरा, शाहिरी वारसा जतन व्हावा या उद्देशाने शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन आयोजित बळीराजा महोत्सवःप्रबोधन दिवाळी पहाटेचे आयोजन बलिप्रतिपदेनिमित्त शाहीर गंधर्व पृथ्वीराज यांचा ‘जागर शाहिरीचा विचार समतेचा’ हा कार्यक्रम नुकताच मोठ्या जल्लोषात झाला. समता, बंधुता, मानवता या सामाजिक मूल्यांवर आधारित विचार समाजात रुजावेत, बळीराजाचा इतिहास व पूजन व्हावे या दृष्टीने हा महोत्सव गेल्या १२ वर्षापासून सुरु आहे.
जात- धर्मापलीकडे जाऊन प्रतिष्ठान गेली २४ वर्ष विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करत आहे. तसेच दरवर्षी संकटग्रस्त बळीराजाला आर्थिक मदत, शैक्षणिक दत्तक योजना राबवली जाते.
महात्मा फुले द्विजन्मशताब्दी निमित्ताने यावर्षी ‘चळवळीतील अवलिया’ पुरस्काराने महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस ॲड. शारदा वाडेकर व भिडे वाड्याची कायदेशीर लढाई यशस्वीतेसाठी योगदान दिलेल्या पुणे मनपाच्या विधी सल्लागार ॲड. निशा चव्हाण या दोघींना उपमहापौर परशुराम वाडेकर व ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते अंकल सोनवणे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच शिवस्पर्श प्रकाशन प्रकाशित वसंत बाबर लिखित धर्मापलीकडचं नातं, महेश सावळे लिखित आदर्शाचे विचारपीठ, उषा शिंदे- वाखारे लिखित सिंधू या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
कार्यक्रमाचा उद्देश, आवश्यकता व महत्व याविषयी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ॲड. शैलजा मोळक यांनी प्रास्ताविकपर मनोगतात माहिती दिली. सचिव प्रज्ञेश मोळक यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.






