मोठी राजकीय घडामोड; अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांकडे भेटीची वेळ

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार प्रफुल पटेल यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली होती.
या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. या भेटीनंतर दोन्ही गटांमधील संवादाचा मार्ग खुला झाल्याचे संकेत मिळत आहेत.

अजित पवार गटाच्या आमदारांकडून भेटीसाठी वेळ
प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदारांनीही शरद पवार यांची भेट घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली असून बुधवारी ही भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीची पूर्वकल्पना दिली होती, तसेच “अजितदादा असते, तर राष्ट्रवादी एकत्र आली असती,” असे विधान तटकरे यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार प्रत्यक्ष शरद पवार यांना भेटणार असल्याने या बैठकीत राजकीय चर्चा काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ही केवळ तब्येतीची विचारपूस; राजकीय चर्चा नाही: राजेश टोपे



दुसरीकडे, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनीही नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, “आज मी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आणि तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. याशिवाय मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर आमच्यात चर्चा झाली. त्यांनी मराठवाड्यातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती घेतली.”






या घडामोडींपूर्वी पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. सध्या शरद पवार मुंबईतच असून, पुढील काही दिवस ते त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी विश्रांती घेणार असल्याचे पवार कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.



विलीनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना ते पुढे म्हणाले, “आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे विलीनीकरणावर बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दादा असताना आम्ही एकत्र येणार होतो, ही बाब आम्ही आधीही मान्य केली होती; परंतु तेव्हा त्यांनीच हा प्रस्ताव नाकारला होता.”

























































