ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी प्रश्नांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे.
सकाळी मुंबईला येत असताना सहा वाजता गाडीत त्यांना दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती हरी नरके यांचे निकटवर्तीय, जवळचे मित्र मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते. प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा या दोन पुस्तकांचा समावेश आहे. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याविषयी हरी नरके यांनी समग्र लिखाण केलं. महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन करणारे संशोधक म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित होते. महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात हरी नरके यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ. आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते.
समतेच्या चळवळीत काम करताना आमच्या असंख्य आठवणी आहेत. दलित-शोषितांच्या प्रश्नांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. शोषित समुहाचे प्रश्न तडीस नेण्यासाठी ते आग्रही असायचे. त्यांच्या निधनाने फुल्यांचा विचार मानणाऱ्या समस्त पुरोगामी चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.









