पुणे विधान परिषद निवडणूक : राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी ; सुनील टिंगरे यांनीही भरला अर्ज

पक्षातील इच्छुकांमध्ये नाराजीची लाट..कार्यकर्त्यांमध्येही चर्चा
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अखेर विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे पक्षाचे नेते खासदार Parth Pawar यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे पक्षातील अनेक इच्छुक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. विक्रम काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर सुनील टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज भरून आपला दावा कायम ठेवला आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी काय होणार हे आता पहावे लागेल. टिंगरे यांनी डमी अर्ज भरला असून काकडे यांचा अर्ज वैध झाल्यानंतर टिंगरे अर्ज माघारी घेतील असे पक्षातील वरिष्ठांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान आज उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी दिवसभर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, बारामती येथील हॉस्टेलमध्ये मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीतच विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा अर्ज भरण्याच्या दिवशी करण्यात आली. या बैठकीला माजी खासदार संजय हे देखील उपस्थित होते. विक्रम काकडे यांच्या उमेदवारीनंतर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचे बोलले जात आहे.

अनेक कार्यकर्त्यांच्या मते, विक्रम काकडे यांचा पक्षाच्या संघटनात्मक कामाशी थेट संबंध नसताना तसेच ते पक्षाचे सक्रिय सदस्य नसल्याचा दावा केला जात असताना त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणारे आणि जनतेचे प्रश्न सातत्याने मांडणारे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अंतिम टप्प्यात वेगळाच निर्णय झाल्याने इच्छुकांमध्ये नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे.
या जागेसाठी पक्षाकडून अनेक नेते इच्छुक होते. त्यामध्ये दीपक मानकर , सुनील टिंगरे, योगेश बहल, विलास लांडे, यांची नावे उमेदवारीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कामाचा अनुभव आणि पक्षाशी दीर्घकाळ नाळ जोडलेली असल्याने या इच्छुकांकडून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र पक्ष नेतृत्वाने अखेरीस विक्रम काकडे यांच्या नावाला पसंती दिली आहे. केवळ पक्ष नेतृत्वाचे निकटवर्तीय एवढा एकच मुद्दा विक्रम काकडे यांच्या बाबतीत लागू झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्ष नेतृत्वासमोर नाराज इच्छुकांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कार्यकर्त्यांच्या नाराजीचे पडसाद संघटनात्मक पातळीवर उमटू नयेत यासाठी पक्षाकडून समन्वय साधण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीत विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने कोणता राजकीय संदेश दिला आहे आणि नाराज इच्छुकांची भूमिका पुढे काय राहणार, याकडे आता पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






