पुणे शहर

पिंपरीपाठोपाठ पुण्यातही थैमान! पुण्यात 5 मृत्यूंसह आकडा 16 वर; विषारी दारुचा संशय

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात 13 जणांचा बळी घेणारी कथित विषारी दारूची दुर्घटना आता पुणे शहरातही पसरल्याचे उघडकीस आले आहे. पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ परिसरात अवघ्या काही तासांत 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या सामूहिक मृत्यूंमुळे संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अत्यंत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी येथे केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून अत्यंत घातक गावठी दारू तयार करण्यात आली होती. हीच जीवघेणी दारू फुगेवाडीसह पुण्याच्या हडपसर भागातही विक्रीसाठी पाठवण्यात आली होती, ज्याचे सेवन केल्यामुळे हा अनर्थ ओढवल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

Img 20251125 wa01783213374507166536090

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेले पाचही नागरिक हडपसर परिसरातील रहिवासी होते. यातील एका व्यक्तीचा मृत्यू काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे, तर उर्वरित मृत्यू हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. मृत पावलेल्या तीनही जणांना दारू पिऊन आल्यानंतर उलट्या होणे आणि पोटदुखी होणे अशी एकसारखीच लक्षणे जाणवू लागली होती. प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवडमधील 13 बळींनंतर आता पुण्यातही 5 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण संशयास्पद बळींची संख्या 18 वर पोहोचली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक या मृत्यूंमागे विषारी दारूच कारणीभूत असल्याचा उघड आरोप करत आहेत. मात्र, असे असतानाही पुणे पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल केलेला नाही.

हडपसर आणि काळेपडळ पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येत असून, अधिकृत पोस्टमार्टम रिपोर्ट आणि रासायनिक विश्लेषणाचा अहवाल हाती आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पोलीस सध्या या भागात दारू पुरवठा करणाऱ्या संशयित अड्ड्यांवर आणि विक्रेत्यांवर नजर ठेवून असून, अहवाल आल्यानंतरच कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांच्या या दिरंगाईमुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये