चांदणी चौकात मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला आग.. मोठे नुकसान

कोथरुड : कोथरूड मधील चांदणी चौकात एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या काल रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत मालवाहतूक करणारा ट्रक जळून खाक झाला आहे.
मुंबई बेंगलोर महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एम एच 12 एन एक्स 6731 या ट्रकला रात्री साडे अकराच्या सुमारास आग लागली. या ट्रकमधून तारांच्या बंडलची वाहतूक करण्यात येत होती व तो गुजरातला निघाला होता. आग लागल्याचे कळताच चालकाने ट्रक महामार्गाच्या बाजूला उभा केला. ट्रकला आग लागल्याने महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
ट्रकला लागलेली आग डिझेल टाकी जवळ पोहचण्याच्या आत अग्निशामक दलाचा बंब पोहोचून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळल्याचे वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जे.एन. होळकर यांनी संगीतले. ट्रकची बॉडी पत्र्याची असल्याने आग पटकन पसरली नाही. मात्र केबिन जळून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले.







