ऑनलाईन फसवणूक टाळण्याबाबत वारजे पोलिसांची सायबर गुन्हे प्रतिबंध कार्यशाळा संपन्न

सायबर गुन्ह्यांबाबत जेष्ठ नागरिकांना केले मार्गदर्शन
कर्वेनगर : सायबर गुन्हे प्रकरणात प्रचंड वाढ झाली असल्याने याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने कर्वेनगर येथील जावळकर उद्यान सभागृहात प्रेझेंटेशनच्या माध्यमातून “सायबर गुन्हे प्रतिबंध कार्यशाळा” पार पडली. संजीवनी ज्येष्ठ नागरिक संघ सदस्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन केले गेले होते.
मोबाईलवर येणाऱ्या लिंक, लॉटरी, फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट, ओएलएक्स, सेक्सटोर्षण फसवणूक, लोन ॲप्सद्वारे होणारी फसवणूक इत्यादी विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोबाईल वर येणाऱ्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी (गुन्हे ) यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले.
शांतता कमिटीचे ॲड. राहुल पाटील व पोलीस उपनिरीक्षक अमोल सावंत यांनी सविस्तर शिबिर घेतले, ऑनलाइन फसवणूक कशी टाळावी व तक्रार कोठे करावी याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माणिक दुधाने, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, सचिव चंद्रकांत जाधव, लोकसेवक प्रविण दुधाने, सहायक पोलिस निरीक्षक ओलेकर व अंमलदार सुतकर व परिसरातील जेष्ठ नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
स्मार्ट फोन व इंटरनेट युगात सायबर क्राईम वाढले असून जेष्ठ नागरिक ही याला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. मोबाईलवर आलेल्या लिंक चुकून उघडल्या गेल्याने फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. अशा प्रकारांमुळे जेष्ठ नागरिकांची फसवणूक होवू नये, त्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माणिक दुधाने यांनी सांगितले.















