काठी माझी वैद्यकीय सोबती ; जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष लेख..

थोरात उद्यानात रोज नियमित सकाळी चालण्यासाठी व्यायामासाठी येणारे कदम काका गेली 3/4 दिवस झाले आलेच नाहीत. काका जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य तर होतेच पण हास्ककल्ब चे सर्वेसर्वा होते. त्यामुळे सहज चौकशी करण्यासाठी घरी गेलो असता, समजले की काकांची काठी तुटली आहे, त्यामुळे चालताना गुडघ्यांवर ताण येऊन गुडघे दुखत आहेत. त्यामुळेच काकांनी येणे टाळले होते.
डाॅ.सचिन नागापूरकर
अस्थीरोग व कृत्रिम सांधेरोपण तज्ञ पुणे
मग दुपारी दवाखान्यातुन येताना काकांसाठी काठी घेऊन आलो. काठी बघून काका खूप खूष झाले व म्हणाले डाॅक्टर ही काठी ना माझा खूप मोठा आधार आहे. ही काठी माझी खरी वैद्यकीय सोबती आहे. त्यामुळेच मला जाणवले खरच काठी ही जेष्ठ नागरिकांसाठी खरी वैद्यकीय सोबती आहे.
काठी साधारणपणे लाकडाची अथवा मेटलची बनवलेली असते. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही काठी खरच एक आधार म्हणून काम करते. जेष्ठ नागरिक, रुग्णांना देखील चालणे सोपे जावे ह्यासाठी नवसंजीवनीचे काम काठी करत असते.
काठीचे तसे बरेच प्रकार आहेत.
1) लाकूडापासून बनवलेली साधी एक पायाची व पकडण्यासाठी वरच्या बाजूला वाकलेली साधी काठी.
गुडघेदुखी, पाय घोटा मुरगळा आलेले असताना, कंबरदुखीचा त्रास असताना, चालताना तोल जात असेल तर अशा परिस्थितीत सहज वापरता येईल अशी ही एक पायाची काठी.
2) तीन अथवा चार पायांची काठी..
ज्यावेळी चालताना भक्कम आधार हवा असतो, त्यावेळी ही तीन अथवा चार पाय असणारी काठी खूप उपयोगी पडते. विशेष बाब म्हणजे अंगरक्षका सारखी ही काठी आपल्या बाजूला ठेवून काम करता येते.
काठी कोणती व कशी विकत घ्यावी
आपण उभे राहीलेले असताना आपला कोपरा साधारणपणे 30 अंश कोनात वाकवून ठेवला तर त्या काठीचे टोक आपल्या मनगटापर्यंत यावे अशा उंचीची काठी वापरावी. बाजारात हल्ली उंची कमी जास्त करता येतील अश्या प्रकारच्या काठ्या उपलब्ध आहेत.
काठीचा वापर कसा करावा
सर्वसाधारणपणे काठी वापरताना ती ज्या पायाला इजा झालेली आहे त्याच्या विरुद्ध बाजूच्या हातात घेऊन वापरावी. उदा.आपल्या डाव्या पायाला इजा,फ्रॅक्चर आहे तर काठी आपण उजव्या हातात धरावी व चालावे.
काठी व ज्या पायाला इजा आहे तो पाय एकत्र पुढे सरकवत चालावे. ज्यावेळी तुम्ही इजा झालेल्या पायावर भार देता तेव्हा काठी तुमच्या शरिराचा भार घेते व तुम्हाला चालताना वेदना कमी जाणवतात.
जीना चढ उतार करताना
जीना चढ उतार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ती म्हणजे जीना चढताना नेहमी इजा न झालेला पाय पुढे प्रथम टाकावा व जीना उतरताना इजा झालेला पाय पुढे टाकावा. जीना चढताना जर बाजूला रेलींग असेल तर उत्तम नाहीतर काठी उत्तम आधार देते. जीना चढताना इजा न झालेला पाय पुढे करावा व नंतर इजा झालेला पाय व काठी सोबत एकत्र एका पायरीवर ठेऊन जीना चढावा. विशेषतः ज्या रुग्णाला गुडघे दुखीचा त्रास आहे व गुडघेबदल सांधावरोपण शस्त्रक्रिया करणे आर्थिक, मानसिक दृष्ट्या करणे जमत नाही किंवा सांधावरोपण शस्त्रक्रिया करण्याची मानसिक तयारी करे पर्यंत अश्या रुग्णांनी जर काठीचा वापर डाॅक्टरांच्या सल्ल्याने केल्यास निश्चितच गुडघ्याच्या वेदना कमी होऊन त्याचे चालणेफिरणे सुरू होऊ शकते.
जीना उतरताना
इजा झालेला पाय व काठी एकत्रपणे प्रथम पुढे ठेऊन उतरावे व नंतर इजा न झालेला पाय पुढे करावा.
खुर्चीमधून उठताना खुर्ची मधून उठताना काठी ज्या पायाला इजा आहे त्याच्या विरुद्ध बाजूला धरावी. ज्या पायाला इजा आहे तो पाय पुढे सरकवावा व ज्या ज्या पायाला इजा आहे त्या बाजूच्या हाताने खुर्ची जराशी मागे सरकवावी व इजा न झालेल्या पायावर वजन देऊन पायावर उभे राहावे.
अतिशय उपयुक्त अशी ही काठी खरंच पेशंटला स्वतः जागेवरून उठण्यासाठी, चालण्यासाठी जीना चढ उतार करण्यासाठी…रुग्णाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.

काठी वापरताना घ्यावयाची काळजी
डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊनच काठीचा वापर सुरू करावा. काठी घेऊन चालताना पायांमध्ये योग्य त्या आकारचे मापाचे पादत्राणे वापरावीत. चालताना जीना अथवा जमिनीवर कोठेही पाणी सांडलेले तर नाही ना याची खात्री करावी अन्यथा पाय घसरण्याची भीती असते. शरिरावरील कपडे खूप सैल असू नयेत. काठी घेऊन चालताना अंगावरील साडी,शाॅल… ओढणी…कोठेही काठीत अथवा पायात अडकणार नाही ह्याची काळजी घ्यावी. काठी घेऊन चालताना. जीन्यात…घरात. रस्यावर योग्य तो प्रकाश आहे ना ते बघावे. काही जणांना वयोमानानुसार डोळ्याने कमी अथवा अंधुक दिसण्याचा त्रास होऊ शकतो तर शक्यतो नेत्र तज्ञाची मदत घ्यावी. लवकरात लवकर डोळ्याचा इलाज करून घ्यावा.
खरंच आजमितीस गुडघे दुखीच्या आजारावर मात करण्यासाठी गुडघ्याची कृत्रिम सांधावरोपण शस्त्रक्रिया हा पर्याय उपलब्ध आहे. निश्चितच आनंददायक व वेदनाविरहीत जगता येईल असे फायदे ह्या कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रियेचे आहेत. पण डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला, योग्य ते औषधोपचार, योग्य सकस आहार व सोबतीला काठीचा योग्य तो वापर केला तर खरंच ही काठी तुमची वैद्यकीय सोबती ठरू शकते.



