पुणे धावले एकतेसाठी… पुणेकर एकवटले नशामुक्तीसाठी !‘पुणे रन फॉर युनिटी’मध्ये ४० हजारांहून अधिक पुणेकरांचा अभूतपूर्व सहभाग!

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून भव्य आयोजन; देशभक्तीचा जल्लोष, नशामुक्त युवा भारताचा संकल्प
२१ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये परदेशी धावपटूंचे वर्चस्व; भारतीय गटात सुनील कुमार आणि रविना गायकवाड अव्वल
पुणे : पहाटेची गुलाबी थंडी… धावपटुंचा सळसळता उत्साह… तरुणाईच्या मोठ्या सहभागाने भारावलेले वातावरण… नशामुक्त युवा भारतच्या घोषणांनी दुमदुमलेला परिसर… आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन एकाच ध्येयाने धावण्यासाठी सज्ज झालेले हजारो पुणेकर! रविवारी सकाळी पुण्याच्या मध्यवर्ती अलका चौकात देशभक्ती, उत्साह आणि क्रीडाप्रेमाचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी’ अर्थात ‘पुणे राष्ट्रीय एकता दौड’मध्ये ४० हजारांहून अधिक पुणेकरांनी सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मतेचा भव्य जागर केला. तरुणाईचा सळसळता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, महिला आणि विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती यामुळे संपूर्ण पुणे शहर जणू एकतेच्या रंगात न्हाऊन निघाले होते.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत या भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करणे, युवा पिढीला नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी प्रेरित करणे आणि सशक्त, निरोगी समाजाचा संदेश देणे हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश होता.

पहाटेपासूनच अलका चौक आणि परिसरात धावपटूंची मोठी गर्दी होऊ लागली होती. विविध वयोगटांतील नागरिक, देश-विदेशातील व्यावसायिक धावपटू, विद्यार्थी, युवक-युवती आणि क्रीडाप्रेमी यांच्या उपस्थितीने परिसराला जणू एखाद्या भव्य क्रीडा महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. धावपटूंच्या चेहऱ्यावरील उत्साह, उपस्थितांचा जल्लोष आणि देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनीही या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.



या स्पर्धेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झेंडा दाखवून आणि खेलरत्नने सन्मानित अंजली भागवत यांच्या विशेष उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, राष्ट्रीय खेळाडू मनोज एरंडे, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय धावपटूंची दमदार कामगिरी; २१ किलोमीटरमध्ये चुरशीची लढत
या भव्य मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील नामांकित धावपटूंनी सहभाग घेतला. २१ किलोमीटर आंतरराष्ट्रीय पुरुष गटात येगो इसॅक किप्रोनो याने १ तास ४ मिनिटे १७ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. केमेई पॉल याने १ तास ४ मिनिटे ४१ सेकंद वेळेसह द्वितीय, तर केनियाच्या एल्कनाह किमेली अरुसेय याने १ तास ८ मिनिटे ५७ सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला.



महिलांच्या २१ किलोमीटर आंतरराष्ट्रीय गटात त्सेहाय देसालेग्न अधाना हिने १ तास १७ मिनिटे ४५ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. सेनयित अयेले अलेमु हिने द्वितीय स्थान मिळवले, तर मुरीुकी जेन वांजिरू हिने १ तास १९ मिनिटे ४६ सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला.
भारतीय गटात सुनील कुमार आणि रविना गायकवाड यांची बाजी
भारतीय पुरुष गटात सुनील कुमार याने १ तास ४ मिनिटे २२ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले. शिवम सिंग तोमर याने १ तास ४ मिनिटे ५२ सेकंद वेळेसह द्वितीय, तर राजन यादव याने १ तास ५ मिनिटे ३४ सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला.
महिलांच्या भारतीय गटात रविना विजय गायकवाड हिने १ तास १७ मिनिटे ३८ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. साक्षी संजय जदाल हिने अवघ्या चार सेकंदांच्या फरकाने १ तास १७ मिनिटे ४२ सेकंद वेळेसह द्वितीय स्थान मिळवले, तर रिनू हिने १ तास १८ मिनिटे १८ सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला. भारतीय धावपटूंमधील ही चुरस स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरली.



दिग्गज क्रीडापटूंच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत विजेत्या धावपटूंचा गौरव करण्यात आला. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, मनोज एरंडे, ऑलिम्पियन रेखा भिडे, शांताराम जाधव, बजाज फिनसर्वचे प्रमुख संजीव बजाज, बुद्धिबळ ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, स्मिता शिरोळे यादव, ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, सुरेखा द्रविड, श्रीरंग इनामदार, महादेव सपकाळ यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
केवळ मॅरेथॉन नव्हे, राष्ट्रीय एकात्मतेचा महासंकल्प!
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील संस्थानांचे एकीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीत दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची आठवण या एकता दौडच्या माध्यमातून करून देण्यात आली. राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करणे, युवकांना देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र आणणे आणि नशामुक्त समाजनिर्मितीचा संदेश पोहोचवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला पुणेकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे ही एकता दौड केवळ क्रीडा स्पर्धा न राहता राष्ट्रीय एकात्मतेचा भव्य उत्सव ठरली.



‘पुणेकरांचा प्रतिसाद हीच आमच्या संकल्पाची खरी ताकद’ – मुरलीधर मोहोळ
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा ‘पुणे रन फॉर युनिटी’चे आयोजक म्हणाले,“नरेंद्रजी मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत राष्ट्रीय एकात्मता आणि नशामुक्त युवा भारताचा संदेश देण्यासाठी ‘पुणे रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित या एकता दौडमध्ये ४० हजारांहून अधिक पुणेकरांनी सहभागी होत राष्ट्रीय एकात्मतेचा अभूतपूर्व जागर केला. देशाच्या एकीकरणासाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले ऐतिहासिक योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. देशाचे भविष्य असलेल्या युवा पिढीने नशामुक्त, सशक्त आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. पुणेकर कोणत्याही चांगल्या संकल्पनेला नेहमीच भरभरून साथ देतात, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. या ऐतिहासिक प्रतिसादाबद्दल सर्व धावपटू, क्रीडाप्रेमी आणि पुणेकरांचे मनःपूर्वक आभार!”
‘देशाची एकता आणि अखंडता टिकवणे ही सर्वांची जबाबदारी’ – रवींद्र चव्हाण
रविंद्र चव्हाण म्हणाले,“‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडचे देशभरात आयोजन करण्यात आले असून, पुण्यात या उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद मिळाला. कोणतीही सकारात्मक संकल्पना पुण्यातून सुरू होते, तेव्हा तिला नेहमीच मोठा पाठिंबा मिळतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. सध्या समाजात ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून आक्रोश निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत देश अखंड ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”



