११ वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अंतिम संधी

दिपाली धुमाळ यांनी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची केली होती मागणी
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील ११ वीच्या विद्यार्थ्यांना केंद्रशासनाकडून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेतून हजारो विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे, परंतु काही विद्यार्थी वैयक्तिक कारणामुळे अजूनही ऑनलाइन प्रवेश प्रक्रीये पासून वंचित राहिलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची आता शेवटची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी गुरुवार दिनांक २० ऑक्टोंबर पर्यंत दैनंदिन गुणवत्ता फेरी म्हणजेच सतत विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
११ वीसाठी काही विद्यार्थ्यांना मुदतीत प्रवेश घेता आले नाहीत परंतु मुदत संपल्याने प्रवेश घेता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ११ वीच्या प्रवेशासाठी ८ दिवसांची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी पुणे विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे ११ वी प्रवेशासाठी मुदत वाढ दिल्याने दिपाली धुमाळ यांनी समाधान व्यक्त केले आहे. मुदत वाढ दिली नसती तर असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले असते पण शिक्षण विभागाच्या मुदत वाढीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचले आहे. विद्यार्थ्यांनी आता वेळ न दवडता प्रवेश घेण्याचे आवाहन धुमाळ यांनी केले आहे.
राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तीनविशेष फेऱ्या आणि २६ सप्टेंबरपासून दैनंदिन गुणवत्ता विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर ही काही विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षेत दिसत होते. अकरावीचे प्रथम सत्र संपत आले असताना प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी मिळावी, म्हणून ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे शिक्षण संचालनालयाने सांगितले आहे.

अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही अंतिम संधी असणार आहे. प्रवेशाच्या कार्यवाहीचे टप्पेही संचालनालयाने प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहेत यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल आणि नवीन प्रवेशाची कार्यवाही बंद करण्यात येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.
प्रवेशासाठी महत्वाची सूचना
१)नवीन विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट रजिस्ट्रेशन /नवीन नोंदणी सुरू असेल,पण ती केवळ १७ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.
२)प्रवेश अर्जाचा भाग एक भरून प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांना भाग दोन आणि महाविद्यालयांना पसंती देऊन फेरीमध्ये सहभागी होता येईल.
३)विद्यार्थ्यांने आपली प्रतीक्षा यादीतील रँक तपासून दररोज भाग दोनमध्ये पसंती नोंदविणे आवश्यक आहे.






