“ग्राहक संरक्षण कायदा व त्यामधील अमुलाग्र बदल” : राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने

फसवणुक झाल्यास ग्राहकांनी पुढे येण्याची गरज
पुणे: भारतात दरवर्षी २४ डिसेंबरला ‘ National Consumer Day’ अर्थात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो. सन १९८६ मध्ये २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तसेच सन १९९१, १९९३, २००२, २०१४ मध्ये कायदयात सुधारणा करण्यात आल्या. परंतू सन २०१९ मध्ये बदलत्या काळाचा व ग्राहकांची होणारी फसवणुक लक्षात घेता ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले.
२४ डिसेंबर २००० साली प्रथम राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळावी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांच्या ग्राहक म्हणुन असलेल्या हक्क आणि अधिकारांबाबत जागरूक व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकार मार्फत अनेक उपक्रम राबविले जातात.
सध्या मुंबई, पुणे या सांरख्या शहरांसोबत इतर शहरे देखील झपाटयाने वाढु लागलेली आहेत व अशामध्ये बांधकाम व्यवसायामध्ये देखील झपाटयाने वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. मुंबई, पुणे या मेट्रोसिटी मध्ये सध्या काही बांधकाम व्यावसायिकांकडून होणारा त्रास, संपुर्ण रक्कम देवुनही सदनिकेचा ताबा मुदतीत न मिळणे, संपुर्ण रक्कम घेवुनही जागेवर काम सुरू न करणे अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसुन येते.
परंतू अनेक लोक हे बांधकाम व्यावसायिकांच्या या त्रासाला बळी पडत असल्याचे दिसुन येते. परंतू त्यांना ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींची माहिती नसल्याने कोणतीही कायदेशीर कारवाई अशा बांधकाम व्यावसायिकांवर करीत नाहीत. त्यामुळे सदर कायद्याची माहिती ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
तसेच सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन खरेदी व त्यामध्ये होणारी फसवणुक याबाबत देखील ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत ई-कॉमर्स नियम लागु केलेले आहेत. सध्या मोठया प्रमाणावर सुरू असलेल्या ऑनलाईन शॉपींगच्या ट्रेंडमुळे सदर ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये बदल केलेले
आहेत. सदरील बदल व नियम Amazon, Flipcart, Snapdeel यांसारख्या ई कॉमर्स साईटवरही लागू आहेत. यामध्ये ई कॉमर्स साईटसाठी अनेक कठोर तरतुदी देखील करण्यात आलेल्या आहेत.
करोनासारख्या जागतीक महामारीमध्ये अनेक वैद्यकीय दवाखाने यांच्याकडुन देखील अनेक लोकांची फसवणुक अथवा सदोष सेवा दिल्याने एखाद्या पेशंटचे नुकसान झाल्याचे आपल्याला पहावयास मिळालेले आहे. सदरल ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये अशा सदोष सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर, हॉस्पीटल यांच्या विरुध्द देखील एक ग्राहक म्हणुन तक्रार करता येते व सदरील हॉस्पीटल अथवा डॉक्टर यांना यामध्ये शिक्षेची देखील तरतुद करण्यात आलेली आहे.
फसवणुक झाल्यानंतर अनेक ग्राहक शांत बसतात आणि त्याचाच फायदा व्यावसायिक मंडळी घेतात, त्यामुळे फसवणुक झाल्याचे कळताच त्याची तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी पुढे आले पाहिजे. जे ग्राहक पुढे येतात त्यांना न्याय मिळतो हे आतापर्यंत आलेल्या निकालांवरून सिद्ध झाले आहे. ग्राहकांनी जागरूक व सतर्क होण्याची गरज आहे.
ॲड.बाळकृष्ण निढाळकर (९८९०४२०१४३)
ॲड.प्रसाद दिवटे (८८८८६४०२३८)




