महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग व व्यापार सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी विवेक धुमाळे

राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने नियुक्ती; राज्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार : धुमाळे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्योग व व्यापार सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुण्यातील उद्योजक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व विवेक पुरुषोत्तम धुमाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष खासदार श्री. सुनील तटकरे यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.

गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, उत्पादन व व्यापार क्षेत्रात कार्यरत असलेले धुमाळे हे ई-व्हिझ ग्लोबल या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक व संचालक आहेत. उत्पादन व व्यापार क्षेत्रातील कंपन्यांसाठी आधुनिक सॉफ्टवेअर आणि व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात त्यांचे योगदान आहे.

Img 20261029 wa00153082406691295416280



बी.ई. (माहिती तंत्रज्ञान), एमबीए अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या धुमाळे यांचा औद्योगिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात व्यापक संपर्क आहे. विविध औद्योगिक संघटना, उद्योजक मंच आणि व्यावसायिक नेटवर्कच्या माध्यमातून ते सातत्याने कार्यरत आहेत.

८०० हून अधिक उद्योजकांशी संपर्क

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेत प्रदेश सचिव म्हणून काम करताना धुमाळे यांनी उद्योजकांना संघटित करण्यावर भर दिला. त्यांच्या संपर्कात राज्यातील ८०० हून अधिक उद्योजक असून, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना पक्षाच्या व्यासपीठाशी जोडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. उद्योजक, नवउद्योजक, व्यावसायिक तसेच औद्योगिक संघटनांशी असलेल्या संपर्काचा उपयोग करून उद्योग व व्यापार सेलची राज्यभर संघटनात्मक बांधणी करण्याचा त्यांचा मानस आहे.

प्रत्येक जिल्ह्यात उद्योग व व्यापार सेल मजबूत करणार

महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), व्यापारी, स्टार्टअप्स आणि औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. एमआयडीसीमधील पायाभूत सुविधा, उद्योगांसमोरील प्रशासकीय अडचणी, वित्तपुरवठा, नवीन गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन या विषयांवर शासन आणि उद्योग क्षेत्रामध्ये प्रभावी समन्वय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्योग व व्यापार सेलची संघटनात्मक रचना मजबूत करून स्थानिक उद्योगांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यावर भर दिला जाणार आहे.

Fb img 17931033768477166369956517137623



अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार – धुमाळे

“आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दाखवलेला मार्ग आणि उद्योग क्षेत्राबाबतचा दृष्टिकोन आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्रावहिनी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे.

महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी, युवा उद्योजक, स्टार्टअप्स तसेच कामगार वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. उद्योग क्षेत्राचा विकास, नवीन गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, कामगारांचे हित व कल्याण आणि प्रत्येक जिल्ह्यात मजबूत संघटना उभारणे ही माझी प्रमुख उद्दिष्टे असतील.

उद्योजक आणि कामगार हे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. उद्योगांच्या तसेच कामगारांच्या समस्या केवळ मांडण्यापुरते मर्यादित न राहता, त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन, उद्योजक आणि कामगार यांच्यात प्रभावी समन्वय व संवादाचा दुवा म्हणून काम करण्याचा माझा संकल्प आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये