विद्युत पुरवठ्यातील तांत्रिक बिघाडांमुळे पुण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत; महापालिकेकडून तातडीच्या विशेष उपाययोजना

पुणे : दिवाळी सणाचा कालावधी लक्षात घेता, नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठीपुणे महापालिकेकडून विशेष दक्षता घेण्यात येत असून, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व अखंडित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
मागील तीन दिवसांत महावितरण (MSEDCL) यांच्या विद्युत पुरवठा यंत्रणेमध्ये तसेच पुणे महानगरपालिकेच्या विद्युत यंत्रणेमध्ये झालेल्या विविध तांत्रिक बिघाडांमुळे पुणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. परिणामी, शहरातील विविध भागांत कमी दाबाने व उशिराने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

१. गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ – नियोजित पाणीपुरवठा बंद
पाणीबचतीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित साप्ताहिक पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
२. शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ – पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत बिघाड
शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे ३५० एमएलडी क्षमतेचे जुने जलशुद्धीकरण केंद्र सुमारे चार तास बंद ठेवावे लागले.
सदर बिघाडाची तातडीने दखल घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सुमारे चार तासांत दुरुस्ती पूर्ण करून जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली.



३. शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ – खडकवासला पंपिंग स्टेशनच्या विद्युत पुरवठ्यात मोठा बिघाड
शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदेड सिटी येथून खडकवासला पंपिंग स्टेशनला विद्युत पुरवठा करणारी महावितरणची एक्स्प्रेस फीडर केबल सुरू असलेल्या बांधकामादरम्यान नुकसानग्रस्त झाली.यामुळे महावितरणमार्फत तातडीने अर्बन ग्राम एक्स्प्रेस फीडर या पर्यायी स्रोतावरून विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली.
मात्र, सदर पर्यायी विद्युत पुरवठा हा ओव्हरहेड विद्युत वाहिनीद्वारे होत असल्याने, या वाहिनीच्या संपर्कात माकड आल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन विद्युत पुरवठा पुन्हा खंडित झाला.



महावितरणमार्फत सदर शॉर्टसर्किटचा बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात आला. तथापि, त्यानंतर केलेल्या तपासणीत खडकवासला पंपिंग स्टेशनमधील दोन विद्युत रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) या शॉर्टसर्किटमुळे नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले.
४. आपत्कालीन उपाययोजना व पंपिंग व्यवस्था पूर्ववत करणे
पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम कमीत कमी ठेवण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था म्हणून डीजी सेट (डिझेल जनरेटर)कार्यान्वित करण्यात आले.
या पर्यायी व्यवस्थेद्वारे वारजे जलशुद्धीकरण केंद्राला कच्च्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एकूण ५ पंपांपैकी ४ पंप सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे सुमारे ८० टक्के क्षमतेने कच्च्या पाण्याचा उपसा सुरू ठेवण्यात यश आले.



दरम्यान, नादुरुस्त झालेल्या दोन्ही रोहित्रांच्या दुरुस्तीचे प्रयत्न करण्यात आले. तथापि, त्यांची तातडीने दुरुस्ती होणे शक्य नसल्याने, संबंधित पंपिंग स्टेशनचे संचालन व देखभाल करणारी संस्था मे. विश्वराज एन्व्हायर्नमेंट लिमिटेड यांच्यामार्फत दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी खासगी पुरवठादाराकडून प्रत्येकी १२०० केव्हीए क्षमतेची दोन विद्युत रोहित्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्यात आली.
त्यापैकी एक रोहित्र यशस्वीरीत्या बसवून कार्यान्वित करण्यात आले असून, आज रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासून संबंधित पंपिंग व्यवस्थेचा नियमित विद्युत पुरवठा व पंपिंग प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
सध्या डीजी सेटवर सुरू असलेल्या उर्वरित पंपिंग व्यवस्थेसाठी दुसरे रोहित्र बसविण्याचे व कार्यान्वित करण्याचे कामदेखील आजच पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
५. पुणे शहरातील पाणीपुरवठ्यावर झालेला परिणाम
गुरुवारी झालेली नियोजित पाणीपुरवठा बंदी आणि त्यानंतर शुक्रवार व शनिवारी सलग उद्भवलेले विद्युत बिघाड यांमुळे शहरातील विविध भागांच्या पाणीपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला.
विशेषतः शहरातील सर्व पेठांचा परिसर, स्टेशन परिसर, खराडी, वडगाव शेरी, भांडारकर रस्ता, कोथरूडचा काही भाग, कर्वेनगर, शिवाजीनगर, औंध तसेच इतर काही भागांत कमी दाबाने व विलंबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
सलग झालेल्या या व्यत्ययांमुळे शहरातील काही पाणीपुरवठा वितरण विभागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची तूट निर्माण झाली आहे.
६. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना



सद्यस्थितीत सर्व प्रमुख विद्युत बिघाड दूर करण्यात आले असून, आज सकाळी ८.०० वाजल्यापासून नियमित पंपिंग प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
मागील तीन दिवसांत निर्माण झालेली पाणीपुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी, तांत्रिक व कार्यान्वयनाच्या मर्यादा विचारात घेऊन शक्य त्या कमाल प्रमाणात अतिरिक्त वेळ पंपिंग करण्यात येणार आहे.विशेषतः कमी दाबाने पाणीपुरवठा होत असलेल्या भागांना प्राधान्य देऊन पुरेसा दाब व नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.उर्वरित रोहित्र बसविण्याचे काम आजच पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर संपूर्ण पंपिंग यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.
तसेच, संबंधित सर्व अभियंत्यांना पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवणे, कमी दाबाच्या तक्रारींना प्राधान्याने प्रतिसाद देणे व आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करून बाधित भागांतील पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
७. सद्यस्थिती
आज दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासून खडकवासला पंपिंग स्टेशनचा नियमित विद्युत पुरवठा व पंपिंग प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली आहे.उर्वरित एका रोहित्राच्या बदलीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत असून, तोपर्यंत संबंधित पंपिंग व्यवस्था डीजी सेटच्या साहाय्याने सुरू ठेवण्यात आली आहे.
मागील तीन दिवसांत निर्माण झालेली पाणीपुरवठ्यातील तूट भरून काढून शहरातील सर्व बाधित भागांचा पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.






