शिवाजीनगर बस स्थानकाचे अत्याधुनिकरण होणार;पीपीपी मॉडेलद्वारे महा-मेट्रो आणि एमएसआरटीसीचा करार

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठपुराव्याला यश
पुणे : राज्यातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक एसटी बसस्थानक पुण्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महामेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यातील सामंजस्य करार, आज (४ नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी राज्याचे परिवहन मंत्री व एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत महा-मेट्रो आणि एमएसआरटीसी यांच्यात स्वाक्षरी करण्यात आल्या. या महत्त्वपूर्ण प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे प्रत्यक्ष उपस्थित होते. या अत्याधुनिक एसटी बसस्थानकाचे टेंडर पुढील महिन्यात काढण्यात येत असून तीन ते चार वर्षांत बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

याविषयी अधिक माहिती देताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “महामेट्रोच्या भुयारी स्थानकाचे काम सुलभ व्हावे म्हणून शिवाजीनगर येथील मूळ एसटी बसस्थानकाचे स्थलांतर २०१९ मध्ये वाकडेवाडी येथे करण्यात आले होते. मेट्रो सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर बसस्थानक पुन्हा शिवाजीनगर येथील मूळ जागेवर आणण्यासाठी मी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होतो. परिवहन विभाग, एसटी महामंडळ आणि शासन स्तरावर अनेक बैठका घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला, आणि अखेर आज या प्रयत्नांना यश आले आहे.”
या प्रस्तावित मल्टी-मॉडेल ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पासाठी सुमारे ८२५ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाचा विकास पीपीपी (PPP) मॉडेलद्वारे करण्याच्या धोरणात्मक निर्णयाला मान्यता दिली आहे. महा-मेट्रो या प्रकल्पाची ‘प्रकल्प अंमलबजावणी संस्था’ (Project Implementing Authority – PIA) म्हणून काम करेल आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागातून हा विकास साधला जाईल.



नवीन स्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक प्रतीक्षागृह, बसगाड्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र वर्कशॉप आणि पार्किंगची विशेष व्यवस्था असणार आहे. तळमजल्यावर प्रवासी स्थानक, पहिल्या मजल्यावर बस पार्किंग आणि त्यावरील मजले पीपीपी तत्त्वावर व्यापारी उपयोगासाठी विकसित केले जातील.
शिवाजीनगर हे आगामी काळात पुण्यातील सर्वांत मोठे एकात्मिक वाहतूक केंद्र म्हणून विकसित होणार आहे. येथे मेट्रोचे दोन मार्ग, शिवाजीनगर रेल्वेस्थानक, जवळच असलेली पुणे व खडकी मुख्य रेल्वेस्थानके, जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावरील मेट्रो इंटरचेंज यामुळे या बसस्थानकाला अत्यंत मोक्याचे स्थान प्राप्त होणार आहे आणि एकात्मिक वाहतूक केंद्र (Transport Hub) म्हणून उदयास येणार आहे.
सध्या आरे डेअरीच्या जागेवर महा-मेट्रोद्वारे तात्पुरत्या स्वरूपात चालवले जाणारे वाकडेवाडी येथील एमएसआरटीसी बस स्थानक, शिवाजीनगर येथील नवीन बस स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मूळ ठिकाणी हलवले जाईल. यासोबतच पीएमपीएल (PMPML) बससेवा आणि रिक्षा प्रवाशांसाठी स्वतंत्र मार्गिका व थांबे उभारले जातील. खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांची यामुळे मोठी सोय होणार असून, रोज १ लाखापेक्षा जास्त प्रवाशांना याचा थेट लाभ मिळेल, असा विश्वास आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.






