रवींद्र धंगेकर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ; जुन्या आठवणींना दिला उजाळा

मुंबई : कसबा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अतिशय प्रतिष्ठेची झालेल्या निवडणुकीत धंगेकर यांनी कसबा मतदार संघ भाजपच्या ताब्यातून घेतला. विजयानंतर ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटणार होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई येथे ठाकरे यांची भेट घेतली.
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी झालेल्या कसबा मतदारसंघाची निवडणूक जिंकल्याने महाविकास आघाडीत चैतन्याचे वातावरण आहे. भाजपचा बालेकिल्ला फोडल्याने धंगेकर यांचीच चर्चा सर्वत्र आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करण्यासाठी कट्टर शिवसैनिक धंगेकर यांच्या बरोबर रस्त्यावर उतरला होता. आदित्य ठाकरे यांनी स्वतः रॅली व सभा घेतली होती. महाविकास आघाडीने एकत्र येत हा बालेकिल्ला भाजपकडून हिसकावून घेतला.
विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना भेटणार असल्याचे धंगेकर यांनी जाहीर केले होते. आज झालेल्या भेटीत उद्धव ठाकरे यांनी धंगेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी आदित्य ठाकरे, मोहन जोशी, सचिन अहिर, अरविंद सावंत , संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते.
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची आज मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. माझ्या राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात ज्या शिवसेनेतून झाली आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून मला मिळालेला सन्मान लाख मोलाचा आहे अशा भावना धंगेकर यांनी व्यक्त केल्या आहेत.










