पुण्यातील बेकायदा बांधकाम प्रश्नी लक्ष घालू : राज्यपालांचे आश्वासन.

बांधकाम व्यावसायिक व चित्रपट निर्माते निलेश नवलाखा यांना दिले राज्यपालांनी आश्वासन
मराठी चित्रपटसृष्टी व सर्व कलाकारांच्या समस्या सोडवण्याबद्दलही चर्चा
पुणे :- पुणे महानगरपालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांप्रकरणी लक्ष घालू तसेच याबाबत महानगरपालिका प्रशासनाला विचारणा करून कारवाई करण्यासंबंधी सूचना करू असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेटी दरम्यान दिल्याचे बांधकाम व्यावसायिक व मराठी चित्रपट निर्माते निलेश नवलाखा यांनी सांगितले.
नवलाखा ह्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांना पत्र लिहिले होते. त्यात कंगना राणावत यांच्या ऑफिसच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने केलेल्या अतिक्रमण कारवाईत वैयक्तिक लक्ष घालून कंगना राणावत यांना बोलवून घेत भेट दिली, त्याप्रमाणे मी सुद्धा मराठी चित्रपट निर्माता आहे व पुण्यात बांधकाम व्यावसायिक देखील आहे, माझा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत हडपसर येथे एक छोटासा अधिकृत बांधकाम प्रकल्प आहे, ह्या भागात बरीच बेकायदेशीर बांधकाम गेल्या चार-पाच वर्षात झालेली आहेत. त्यामुळे कायदेशीरपणे बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांना त्रास होत आहे. याबाबत तक्रारी करूनही त्यावर काहीही कारवाई आजपर्यंत झाली नाही, याकडे लक्ष वेधले होते.
कंगणा राणावत यांचे बांधकाम बेकायदेशीर होते परंतु माझे बांधकाम कायदेशीर आहे. माझ्यासारख्या कायदेशीर मार्गाने व्यवसाय करणार्याला सरकारकडून संरक्षण मिळावे व मराठी चित्रपट निर्मात्याला आपले म्हणणे मांडायची संधी मिळावी. हे मुद्दे त्यांनी पत्रात मांडले होते. त्याची दखल घेऊन राज्यपालांनी नवलाखा यांना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता भेटीचे निमंत्रण दिले होते.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले हे देखील नवलाखांसोबत भेटीसाठी गेले होते. नवलाखा यांनी सदानंद मोरे लिखित ‘लोकमान्य ते महात्मा’ ह्या कादंबरीचे दोन्ही खंड व चिनार पब्लिकेशनचे कारगिल काॅफी टेबल बुक राज्यपालांना भेट दिले. यावेळी नवलाखा यांनी बांधकाम व्यवसाय व महानगरपालिकेतील कारभार आणि समस्यांबाबत चर्चा केली त्यावर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत या प्रश्नी पुणे महानगरपालिकेत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. कोविडमुळे उद्भवलेल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीबाबत राज्यपालांबरोबर चर्चा झाली. असे नवलाखा यांनी सांगितले.
कलाकारांच्या प्रश्नाबाबत योग्य दखल घेऊ : राज्यपाल
मेघराज भोसले यांनी महाराष्ट्रातल्या आठ लाख कलाकारांच्या व्यथा मांडल्या व महाराष्ट्र सरकारने कलाकारांसाठी एक स्वतंत्र बोर्ड तयार करुन त्यांचा आरोग्य विमा आणि घरांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. त्यावर कलाकारांच्या प्रश्नासंदर्भात राज्यपाल यांनी योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले.



