
पुणे : युवकांमध्ये दिवसेंदिवस व्यसनाधीनता वाढत आहे. व्यसनमुक्तीच्या जनजागृती आणि प्रबोधनासाठी आगामी काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुण्यासह अहिल्यानगर आणि नाशिक विभागातील सव्वाशे महाविद्यालयात व्यसनमुक्ती अभियान राबविणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिली.

पुणे शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ चार अंतर्गत निर्भय विद्यार्थी अभियान मागील अनेक वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. पुणे पोलीस व निर्भय विद्यार्थी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अमली पदार्थ विरोधी सप्ताहाच्या निमित्त विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप पुणे विद्यापीठातील नामदेव सभागृहात करण्यात आला. यावेळी डॉ. काळकर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर, पुणे महापालिका माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे, मनोदय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव किशोर कामथे यांच्यासह पुणे शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह परिमंडळाच्या विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.



डॉ. काळकर म्हणाले , ” सध्या घरातील बंधने कमी झाली आहेत. त्यामुळे कुटुंबांमध्ये संवाद होत नाही. काही व्यसने अदृश्य झाली आहेत. तर नव्याने काही व्यसने निर्माण झाली आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी सामुहिक प्रयत्न गरजेचे आहेत. गेल्यावर्षी विद्यापीठस्तरावर “खेळा आणि शिका” ही संकल्पना राबविली होती. तर यावर्षी व्यसनमुक्ती जनजागृती अभियान विद्यापीठातील सव्वाशे महाविद्यालयांमधून राबविण्यात येणार आहे.”



डॉ. मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, “व्यसनमुक्तीसाठी अमली पदार्थांचा पुरवठा व साखळी तोडणे आवश्यक आहे. व्यसन करणाऱ्यांचा वयोगट कमी होत आहे. लहान मुलेही व्यसनाच्या जाळ्यात अडकत आहेत. एमडी आणि मोबाईल स्क्रिनचे व्यसन वाढत आहे. अमली पदार्थ आणि स्क्रिन यांचा संबंध लक्षात घेऊन त्यावर नाविन्यपूर्ण उपचार शोधण्याची गरज आहे. व्यसनावर सातत्याने मोकळेपणाने चर्चा व उपाययोजना करण्याची गरज आहे.
देशभरात अमली पदार्थांचा विळखा वाढत आहे. हा विळखा तोडण्यासाठी अमली पदार्थ विरोधी विशेष कृती दल कार्यरत आहे. अमली पदार्थांचा पुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी तोडणे मोठे आव्हान आहे. ही साखळी तोडल्यासाठी समाजातील सर्व घटकांनी साथ देण्याची गरज आहे.”



पोलीस दलाच्या वतीने गुन्हेगारी रोखण्यासाठी बालकांसह समाजातील सर्व घटकांचे जनजागृती व प्रबोधन सुरू आहे. निर्भय विद्यार्थी अभियानाच्या माध्यमातून बाल गुन्हेगार व व्यसनमुक्ती यावर सातत्याने काम सुरू असून शाळा महाविद्यालयांसह समाजातील सर्व घटकांनी या विधायक उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त चिलू्मुला रजनीकांत यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्भय विद्यार्थी अभियानचे संस्थापक सदस्य ॲड. दिलीप कु-हाडे यांनी केले. सुत्रसंचालन निखील गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक पवार यांनी केले.



