पुणे हे देशातील तरुणांसाठी संधीचं शहर – नरेंद्र मोदी

हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो लाईन-3 मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पुणे हे देशातील तरुणांसाठी संधीचं शहर आहे. पुणे विकसित भारताच्या संकल्पनेला ऊर्जा देतंय. आजचा दिवस गुड गव्हर्नन्सचं उत्तम उदाहरण आहे… असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. माण–हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो लाईन-3 मार्गिकेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते..
4 नोव्हेंबरपासून सकाळी 6 वाजल्यापासून 17 स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार असून, गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. पुण्याची ही मेट्रो हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी करणार असून या मेट्रोतून 14 हजार लोक प्रवास करतील अशी शक्यता आहे.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला पायलट असल्यानं पिंक लाईन विशेष – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला पायलट असल्यानं पिंक लाईन विशेष असणार आहे. मेट्रोमुळे हिंजवडी IT पार्क, बालेवडीतलं ट्रॅफिक कमी होणार आहे.. यामुळे रोज 2.5 लाख प्रवाशांना मेट्रोचा लाभ होणार आहे.पुणे मेट्रोची मार्गिका 3 याला पिंक लाइन मार्ग नाव देण्यात आलं आहे. तसंच, पुणे आयटी सिटी मेट्रो म्हणूनही ओळख मिळणार आहे. हिंजवडीत आयटी पार्कमुळं मोठी वाहतूक कोंडी होते. पुणेकरांना तासनतास या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत होते. मात्र या मेट्रोमुळं ही वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होणार आहे.



पुणे मेट्रो 3 मुळे अजितदादांचं स्वप्न पूर्ण होणार आहे – सुनेत्रा पवार
पुणे मेट्रो 3 मुळे अजितदादांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अजितदादांनी स्वतः हिंजवडी स्टेशनची पाहणी केलेली. 8 हजार 313 कोटींचा हा मेट्रो प्रकल्प आहे. या मार्गावरील 100 महिला पायलट चालवणार आहेत… असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केलं आहे.
पुणेकरांच्या दृष्टीने आजचा ऐतिहासिक दिवस – एकनाथ शिंदे
पुणेकरांच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पुणे मेट्रो प्रकल्पात अजितदादांचा सिंहाचा वाटा होता. अजितदादा पुण्याच्या बाबतीत फार संवेदनशील होते… असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.



हिंजवडी आयटी पार्क हे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. आयटी पार्कमध्ये कार्यरत असणारे अनेक कर्मचारी स्वतःची कार किंवा दुचाकी वापरतात. त्यामुळं येथील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर पार करण्यासाठी सध्या रस्त्याने पीक अवर्समध्ये 1 ते दीड तास लागतो. मात्र मेट्रोमुळं हे अतंर फक्त अर्धा ते पाऊण तासांत पार करता येणार आहे.
मेट्रो स्थानकांवरून आयटी कंपन्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फीडर बस सेवा, ई-सायकल आणि शेअरिंग रिक्षांचे नियोजन केले जात आहे. यामुळे प्रवाशांना मेट्रोतून उतरून कंपनीत जाणे सोपे होईल आणि मुख्य रस्त्यांवर गर्दी होणार नाही, अशी माहितीही समोर येत आहे.



मेट्रो 3 मार्गिका शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) इंटरचेंज स्टेशनला जोडली जाईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड (PCMC), वनाझ, किंवा रामवाडीहून येणारे प्रवासी थेट मेट्रो बदलून हिंजवडीला जाऊ शकतील. यामुळे संपूर्ण पुण्यातून हिंजवडीकडे जाणाऱ्या खाजगी वाहनांचा ताण कमी होईल.
मेट्रो मार्गिका 3 ही बुधवार 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मेट्रोतून जिल्हा न्यायालय ते हिंजवडी फेज 3 पर्यंत प्रवास करण्यासाठी 62 रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात केवळ 17 स्थानकांवर मेट्रो थांबणार असून, तर उर्वरित सहा स्थानके जानेवारीत सुरू होण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगर, बाणेर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर-पाषाण लिंक रोड आणि भोसलेनगर ही स्थानके सध्या बंद आहेत.
तिकीट दर असे आहेत…
0-2 किमी 12 रुपये
2-4 किमी 25 रुपये
4-8 किमी 37 रुपये
8-12 किमी 45 रुपये
12-18 किमी 49 रुपये
18 किमीच्या पुढे 45 रुपये



