एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा..

पुणे : एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात व विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी पारंपारिक वेशभूषेत भगवे फेटे घालून या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या.
शिवराज्यभिषेक सोहळ्याचे ३५० वर्ष म्हणून यंदाचे वर्ष खास असल्याने याप्रसंगी विद्यार्थिनींनी शिवगर्जना, ध्येयमंत्र, ग्रंथदिंडी, लेझीम सादरीकरण, राजभाषा गुणगौरव गीत, कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती सादरीकरण, ओवी, गवळण, लावणी, यासारखे साहित्यप्रकार तसेच बालशिवबा आणि जिजाऊ संवादपर लघुनाटक, अफजलखान वध प्रसंग यामध्ये विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला. यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नलिनी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन डॉ. सारिका बहिरट यांनी केले होते.

यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठ पुणे आवार समन्वयक प्रा. शितल मोरे, भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञान स्रोत केंद्र उपग्रगंथपाल डॉ. विलास जाधव, तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, पुणे उपकेंद्राचे विभाग प्रमुख डॉ भास्कर इगवे आदी उपस्थित होते.
यावर्षी आणखी एक विशेष बाब म्हणजे बीए बीएड ITEP च्या विद्यार्थिनी ज्यात बहुतांश महाराष्ट्रा बाहेरुन आलेल्या आहेत त्यानी लेझीम सादर करुन मराठी दिन कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या बीएडच्या विद्यार्थिनी, आणि प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.












