कोथरुड

विडा घ्या हो नारायणा विडा आणि अध्यात्म

कोथरूड : गौरी गणपतीच्या दिवसात नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी नातींना- स्वरा आणि अवनीला- शिकविले विडे ! लहानपणी आईच्या हाताखाली करायला लागून शिकलेली कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवी, हा उद्देश त्यामागे होता.

या विड्यांशी झालेली ओळख म्हणजे सणावारी किंवा
झाल्याकेल्याला जेव्हा आई विडे करी त्यावेळी जेवणं झाल्यावर दुपारी ताईंचे पणजोबा पितळी खलबत्त्यात विडा कुटून घरातील मुलांना भरवित. तो पाचक असतो असं सांगत.

या त्रयोदशगुणी विड्यात काय काय असे ? १३ गोष्टी –
पान, सुपारी, कात, चुना, वेलदोडा, जायपत्री, ओलं खोबरं, बडीशोप, बदाम, गुलकंद, लवंग, गुंजेचा पाला आणि आस्मानतारा.

आता कालपरत्वे पानचटणी, पान मसाला असे जिन्नसही माधुरीताई घालतात. नाजूकपणे विडे गुंडाळणे हे ही कौशल्याचे काम असते. पट्टीचे विडे, गोविंद विडा, परडी विडा, फ्लॉवरपॉट, फुटाण्याच्या पुडीसारखा लवंग न लावता गुंडाळण्याचा विडा असे आठ प्रकार ताई करतात.

परवा विडे करता करता ताईंना एक विड्याचं गाणं आठवलं. दौंडला नेनेचाळीतील मुरलीधराच्या मंदिरात काकडआरतीला नैवेद्य दाखवून झाला की हे गाणं आजी, आई आणि इतर बायका म्हणत.

लहानपणी कानावर पडून पाठ झालेल्या या गाण्यात केवढं अध्यात्म दडलंय हे विड्यांच्या निमित्ताने माधुरीताईंच्या लक्षात आलं. गाण्याचे शब्द असे आहेत –

विडा घ्या हो नारायणा
कृष्ण जगत्र जीवना
विनविते लक्ष्मीबाई
दासी होईन मी कान्हा ।।१।।

शांती ही नागवेली
पाने घेऊनिया करी
मी पणा जाळूनिया
चुना लावियेला वरी ।।२।।

दया ही जायपत्री
क्षमा लवंगा आणिल्या
सुबुद्धी वेलदोडे
तुजला मी अर्पियले ।।३।।

विवेक हा कातरंग
रंगे रंगला श्रीरंग
वैराग्य जायफळ
नेळविले सकळ ।।४।।

वासना जाळूनिया
चूर्ण केली सुपारी
भावार्थ कापूराने
बोळविली निर्धारी ।।५।।

विड्यांच्या निमित्ताने हे काकडआरतीतले गाणे अगदी चालीसह आठवले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये