क्रीडा

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

कोथरुड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात क्रीडादिन उत्साहात संपन्न झाला . यावेळी भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते करण्यात आले.

जागतिक संकट कोरोना विरुध्द लढण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार १४ खेळाडू विद्यार्थी व १८ स्टाफने सामाजिक अंतर राखत प्रा. अनिल दाहोत्रे यांनी दिलेली शपथ ग्रहण केली.

झावरे मार्गदर्शन करताना म्हणाले, १९२८, १९३२ आणि १९३६ साली भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू ध्यानचंद सिंग यांचा जन्म दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांनी १९२६ ते १९४८ सालापर्यंतच्या क्रीडा कारकिर्दीत ४०० हून अधिक गोल्स केले. १९३६ साली ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने जर्मनीच्या हॉकी संघाला पराभूत केले. त्यानंतर हिटलरने ध्यानचंद यांची सर्वोत्तम कामगिरी पाहून त्यांना जर्मनीच्या लष्करात येण्याची विचारणा केली होती. परंतु ध्यानचंद यांनी त्यासाठी स्पष्ट नकार दिला. ध्यानचंद यांच्या कारकिर्दीतील सुवर्ण पदकाचा कमाईनंतर भारत हॉकीमध्ये प्रभावशाली संघ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५६ मध्ये भारत सरकारने ध्यानचंद यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जाणारा पद्मभूषण प्रदान केला. ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने भारतीय क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मनाचा मानला जाणारा जीवनगौरव पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी राष्ट्रपती भवनात देशाचे राष्ट्रपती देशातील सर्वोत्तम खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करतात.

या वेळी क्रीडा संचालक प्रा.अनिल दाहोत्रे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ .सुनीता डाकले, प्रा.संतोष मोरे, प्रा.तानाजी जाधव, प्रा .बडनौर, प्रा.तारू मॅडम, कार्यालयीन अधिक्षक श्री.हरी सोळंकी, महाविद्यालयाचे खेळाडू व स्टाफ, शिक्षकेत्तर कर्मचारी हे उपस्थित होते.

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे वतीने गुगल फॉर्मच्या माध्यमातून राष्ट्रीय स्पोर्ट्स क्यूझ ऑनलाईन देण्यात आली होती यामध्ये महाराष्ट्रतुन ७२.०८%, सह १९ राज्यातून ३९६ क्रीडाप्रेमींनी सहभाग घेतला होता. हे स्पोर्ट्स क्यूझ विद्यार्थ्यांचे मागणीनुसार पुढे सुरूच राहणार आहे. राष्ट्रीय क्रीडादिन विशेष कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ. योगेश पवार, प्रा.अनिल दाहोत्रे, प्रा.अशोक शेळके, कार्यालयीन अधिक्षक हरी सोळंकी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये