बालेवाडीतील महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांची झाली तपासणी ; औषधोपचारा बरोबर शस्त्रक्रियाही मोफत.. रुग्णांना मोठा दिलासा

संयोजक लहू बालवडकर यांचे सहभागी रुग्णांना आवाहन..
बालेवाडी : आरोग्य सेवेच्या अंतर्गत मोफत औषधोपचार, विविध आजारांवर तपासण्या, तसेच गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेची शाश्वती मिळाल्याने हजारो रुग्णांना बालवाडी मध्ये आयोजित अटल सेवा महाआरोग्य शिबिर 2025 मध्ये सहभागी होऊन दिलासा मिळाला. भाजप पुणे शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या वतीने या शिबिराचे संयोजन करण्यात आले होते.
लहू बालवडकर सोशल वेलफेअर, सनराईज मेडिकल फाउंडेशन, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पुणे महापालिका, यांच्या संयुक्त विद्यमाने, आयोजित दोन दिवसीय अटल सेवा महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांना लाभ झाला. या शिबिराचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिबिराला भेट देत उत्तम आयोजनाबाबत कौतुक केले.
पुण्यातील नामांकित हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. शिबिरात प्रत्येक आजारावरील उपचारासाठी स्वतंत्र तपासणी विभाग करण्यात आला होता. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची कोणतीही गैरसोय न होता नियोजनबध्द पद्धतीने नोंदणी करून त्यांच्यावर तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

या शिबिरात नेत्र तपासणी व चष्मे वाटप, अस्थीव्योंगोपचार, मेंदुरोग, मूत्ररोग, कान नाक घसा तपासणी, ग्रंथींचे विकार, त्वचा व गुप्त रोग, हृदयरोग, जनरल सर्जरी, स्त्री रोग, दंत रोग, श्वसन विकार व क्षयरोग, बालरोग, मानसिक आरोग्य, कॅन्सर अशा विविध आजारांवर तपासण्या करण्यात आल्या. या मध्ये आवश्यक असणाऱ्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कोविडच्या निमित्ताने माणसाला आरोग्या इतकं महत्त्वाचं काहीच नाही याची जाणीव झाली. या काळात आरोग्य व्यवस्थेची टेस्ट झाली आणि त्या कशा सुधारता येतील याकडे लक्ष गेलं . सर्वांना आरोग्य सेवेचेही महत्व कळालं. लहू बालवडकर यांनी या आरोग्य सेवेच्या उपक्रमाचं आयोजन केल्याने त्यांचं मी कौतुक करतो. आता आपण छोट्या छोट्या आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून समाजाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण वेळीच काळजी घेतल्याने लांबचे आजार उद्भवत नाहीत. या महा आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांना आरोग्य सेवा मिळणार असल्याची बाब महत्वपूर्ण आहे.



केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दुसऱ्या दिवशी शिबिराला भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, जनतेप्रती देशाप्रती समर्पित जीवन अटलजी जगले, तोच संकल्प लहू बालवडकर यांनी घेतला आणि अटलजींची जन्मशताब्दी साजरी करत असताना लोकांसाठी सामाजिक उपक्रम घेत या आरोग्य शिबिराचा आयोजन केल्याने मी लहू बालवडकर यांचे अभिनंदन करतो. बालवडकर यांनी फार मोठी यंत्रणा या आरोग्य शिबिरासाठी उभारलेली आहे. राजकीय जीवनात काम करत असताना कार्यकर्ता काय उद्देशाने काय भावनेतून काम करतो हे सुद्धा महत्त्वाचं असतं भाजपच्या कार्यकर्त्यांवरती हेच संस्कार केले गेले की राजकारण कमी आणि समाजकारण जास्त केलं पाहिजे आणि अशा उपक्रमातून ते सिद्ध होतं. मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये आली आणि त्यांनी एवढया मोठ्या प्रमाणावरती आरोग्य शिबिराचे आयोजन केलं. केंद्र शासन, राज्यशासन, महापालिका यांच्या विविध योजनांच्या लाभ इथे थेट दिला जाणार आहे. एवढ मोठ स्वरूप या महाआरोग्य शिबिराचे आहे आणि ही गर्दी पाहता दोन दिवसात इथे हजारो लोकांनी या शिबिराचा लाभ नक्की घेतला असेल यात शंका नाही उलट दोन दिवस कमी पडले असतील असं मला वाटतं. सर्व समावेशक असं या आरोग्य शिबिर आयोजित केल्याने लहू बालवडकर व त्यांच्या संपूर्ण टीमच अभिनंदन करेल. कोविड सारख्या काळातही त्यांनी लोकांसाठी मोठ काम केलं. अशा कार्यकर्त्याचा आम्हाला अभिमान वाटतो..
लहू बालवडकर म्हणाले, रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणतात, या अटल सेवा महाआरोग्य शिबिरातून हजारो रुग्णांची सेवा करता असल्याने मनाला मोठं समाधान मिळालं आहे. दोन दिवसात हजारो रुग्णांनी विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात शिबिराचा लाभ घेतल्याने शिबिर घेण्यामागचा हेतू साध्य झाला.
शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांनी पुढील उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी लहू बालवडकर सोशल वेलफेअरशी किंवा माझ्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन लहू बालवडकर यांनी शिबिरानंतर केले आहे.


