निवडणूक आयोगाचे सरकारला महत्वपूर्ण पत्र ; निवडणुका कधीही लागण्याची शक्यता..

मुंबई : मुदत संपलेल्या महापालिकेच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कधी निवडणुका मे महिन्यात होणार असे बोलले जात आहे तर कधी त्या सहा महिने पुढे ढकलल्या जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु आता निवडणूक आयोगाने विधिमंडळात करण्यात आलेल्या ठरावानुसार वॉर्डच्या फेररचनेचे काम सुरु करा असे पत्र सरकारला पाठवले असल्याची माहिती मिळत आहे या फेररचना झाल्यानंतर निवडणूका केव्हाही लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच निवडणूक आयोग निवडणुका घेण्यासाठी घाई करत असल्याचे दिसत आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांची आहे. या आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत हा प्रस्ताव विधिमंडळात एकमताने मंजूर करून वॉर्ड रचनांचे अधिकार सरकारने स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे फेररचनाचे काम करा असे पत्र निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले असल्याची माहिती मिळत आहे. या नव्या रचनांना मान्यता मिळाल्यानंतर प्रलंबित निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणुका वेळेत घ्याव्यात यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ७ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार याकडेही सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच निवडणुका आयोगाने सरकारला वार्डच्या फेररचना कराव्यात यासाठी पाठवलेले पत्राने नवीन खळबळ उडवली आहे.




