अमित शाहांच्या मंत्रालयाने दिले वानखेडेंविरोधात कारवाईचे आदेश

मुंबई : आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे अडचणीत आले आहेत. या प्रकरणामध्ये निकृष्ट दर्जाचा तपास केल्याबद्दल आणि खोटं जातप्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गृहमंत्रालयाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
अमित शाह यांच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्रालयाने संबंधित मंत्रालयाला (अर्थ मंत्रालयाला) एनसीबीचे माजी अधिकारी असणाऱ्या वानखेडे यांच्याविरोधात क्रुझ प्रकरणाचा निकृष्ट दर्जाचा तपास केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे.
सरकारने समीर वानखेडेंच्या खोट्या जातप्रमाणपत्रासंदर्भात आधीच कारवाईला सुरुवात केली आहे. वानखेडे यांच्या खोट्या जातप्रमाणपत्रासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुरावे सादर करत आरोप केल्यानंतर या प्रकरणात तपास करुन कारवाईला सुरुवात करण्यात आली. आज एनसीबीचे उपनिर्देशक संजय सिंह यांनी वानखेडेंच्या टीमकडून तपास करताना चूक झाल्याचं म्हटलं आहे.
वानखेडेंच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासामध्ये अनेक त्रुटी होत्या. तपास करताना, धाडी टाकताना व्हिडीओग्राफी करण्यात आली नाही. सापडलेल्या गोष्टींचा तपास करतानाही चूका झाल्या. यामध्ये आर्यन खानच्या फोनमधील माहितीचा तपासही चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचं निष्पण्ण झालं. आर्यनचा या प्रकरणाची काहीही संबंध नसल्याचं तपासात स्पष्ट झालं.
एनसीबीने काय सांगितलं?
“या प्रकरणाचे तीन भाग आहेत. पहिला भाग मुंबई एनसीबीने दाखल केलेला गुन्हा आणि त्यांचा तपास. दुसरा भाग म्हणजे काही वाद आणि अनियमितता समोर आल्यानंतर एसआयटीने संजय सिंग यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला. त्यांच्या तपासात १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं जाऊ शकतं आणि ६ जणांविरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्याने आरोपपत्र दाखल करता येणार नाही, असं समोर आलं,” असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
“तिसरा भाग ‘व्हिजलन्स प्रकरणाचा’ आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी करून त्यांच्याकडून पुरावे गोळा केले जातील. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय षडयंत्राची बाब सिद्ध होऊ शकलेली नाही. एनसीबी केवळ व्हॉट्सअप चॅटच्या आधारे सबळ पुरावे गोळा करू शकली नाही,” असंही एनसीबीने सांगितलं.
प्रसारमाध्यमांनी आर्यनला क्लीन चीट देण्यात आल्यासंदर्भात विचारणा केली असता समीर वानखेडेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यांनी पत्रकारांना सॉरी असं म्हटलं. “सॉरी, मी आता एनसीबीमध्ये नाही, त्यामुळे या विषयावर बोलू शकत नाही. यासाठी तुम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोला,” अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.




