कृषी पर्यटनातून आर्थिक विकास व प्रतिष्ठा ; आज १६ मे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त मार्ट चे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांचा विशेष लेख

पुणे : कृषी पर्यटन म्हणजे शेतावरील सहल, फेरफटका आजच्या धकाधकीच्या जीवनात कृत्रिम जीवनशैलीचा उबग आलेल्या शहरी लोकांना चार दिवस शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन रहायचे व शेतकऱ्यांनी त्यांना सशुल्क पाहुणचार करायचा अशी ही कृषी पर्यटन संकल्पना आहे. कृषी पर्यटन म्हणजे कृषी आधारीत शेतकऱ्याला प्रतिष्ठा व आर्थिक पाठबळ देणारा उद्योग. शेतकऱ्यांनी आपल्या फळत्या, फुलत्या शेतावर आयोजित केलेली आनंददायी मौज व यातून मिळणारे कृषी ज्ञान म्हणजे कृषी पर्यटन उपक्रम.

१) ग्लोबल कृषी पर्यटन…….
कृषी पर्यटनाचा उगम जगात सुमारे ७० वर्षापूर्वी व्यवसायिक पातळीवर ऑस्ट्रेलियात झाल्याचे मानले जाते. ऑस्ट्रेलियासह ब्राझील, न्यूझीलंड, कॅनडा, इटली या देशात कृषी पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. युरोपीय देशांनी तर कृषी पर्यटनाला चालना देऊन त्याला शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यताही दिली आहे. जागतिकरणामुळे कृषी पर्यटनाला विस्तार जगभरात होऊ लागला आहे.
२) महाराष्ट्राचे कृषी पर्यटन……
भारत देशात कृषी पर्यटनाची सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. रायगड जिल्ह्यातील नेरळ या गावात प्रयोगशील शेतकरी श्री. चंद्रशेखर भडसावळ यांनी १९८७ मध्ये देशातील पहिले कृषी पर्यटन केंद्र सुरू केले. या संकल्पनेचे ते जनक आहेत म्हणून मार्ट संस्थेने २९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी श्री चंद्रशेखर भडसावळ यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने Father of Agritourism कृषी पर्यटनाचे जनक हा किताब बहाल केला.



बारामतीतील प्रगतशील शेतकरी स्व. आप्पासाहेब पवार हे आपल्या शेतावर नाविण्यपूर्व कृषी संशोधन प्रयोग दाखवण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून शेतकऱ्यांना बोलवत व येणाऱ्या शेतकऱ्यांची निशुल्क राहण्याची व जेवणाची सोय करत कालांतराने शुल्क आकारून पुढे बारामती ॲग्री अँड इको टुरिझम नावाने कृषी पर्यटन केंद्र नावारूपास आले.
आज राज्यात साधारण १२०० पेक्षा अधिक कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांना पर्यटनाच्या सुविधा देत आहेत. त्यांची वाटचाल उत्तमरित्या चालू आहे. विशेषतः या नविन शेतीपूरक जोडव्यवसायात अनेक युवक, युवती उच्चशिक्षित पदवीधर सहभागी झाले आहेत.



ग्रामीण भागाशी नाळ तुटलेल्या शहरातील नागरिकांना कृषी पर्यटनाच्या रूपाने पुन्हा एकदा गावाकडचे जीवन अनुभवण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्रात जवळपास ३५० छोटे मोठे किल्ले, आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेण्या आणि ७२० कि.मी. अंतराची अथांग समुद्र किनारपट्टी, निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा ही महाराष्ट्राच्या पर्यटनातील मोठी उपलब्धी आहे. याचबरोबर कृषी पर्यटन हे पर्यटनातील नविन चेहरा म्हणून उदयास आले आहे.



‘मार्ट’ संस्थेचा उदय……….
महाराष्ट्रात विस्तरणारे कृषी पर्यटन, भविष्यातील दिशा, पर्यटकांच्या वाढत्या गरजा व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या या गोष्टीचा विचार करून १२ डिसेंबर २००८ म्हणजेच तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांचे वाढदिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेच्या संस्थापक, अध्यक्षा व मार्गदर्शक उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी कृषी पर्यटनातील शिखर संस्था महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सह. महासंघ मर्या. (‘मार्ट’) ची स्थापना केली. वेळोवेळी आजपर्यंतच्या संस्थेच्या प्रवासात अजितदादा यांचे मार्गदर्शन लाभत आले होते. तर सुनेत्रावहिनी यांचे मार्गदर्शन कायम मिळत असते. मार्टच्या कार्यामुळे कृषी व ग्रामीण पर्यटनात काम करणारे कार्यकर्ते, शेतकरी यांना हक्काच व्यासपीठ प्राप्त झाले असून राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटनात सुसूत्रता आली आहे. राज्यातील विविध तालुक्यात कृषी व ग्रामीण पर्यटनात कार्यरत असणाऱ्या सहकारी संस्था मार्टशी सलंग्न आहेत.
मार्टने मागील दहा बारा वर्षात कृषी पर्यटन प्रशिक्षण अभियान राबवून कृषी पर्यटनविषयी तांत्रिक माहिती, यशोगाथा या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली व या व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले आहे. कृषी पर्यटन व्यवसायाबाबत मार्टने काही मूलभुत तत्त्वे, मापदंड तयार केले त्यानुसार हा व्यवसाय आज प्रगतीपथावर आहे.



महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग यांच्या २८ सप्टेंबर २०२० च्या मंजूर धोरणानसार कृषी पर्यटनासाठी आवश्यक बाबी:…
१) खेडेगाव:
कृषी पर्यटन केंद्र हे शहराच्या हद्दीपासून किमान ५ कि.मी. बाहेर आणि खेडेगावामध्ये असावे. पर्यटक शेतकऱ्यांच्या शेतावर येण्यासाठी रस्ता असणे गरजेचे आहे. गावाभोवती दाट झाडी, नद्या, ओढे, डोंगर असल्याने पर्यटकांना मनसोक्त आनंद घेता येईल.



२) शेतकरी: कृषी पर्यटन केंद्र चालविणारी व्यक्ती ही स्वतः शेतकरी असावा तसेच शेती शेतकऱ्यांच्या स्वतःच्या अथवा कुटुंबातील सदस्याच्या नावावर असावी. शेतकरी हा पर्यटक शेती आणि ग्रामीण जीवन यांचा समन्वय साधून पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणारा मुख्य घटक आहे. कृषी पर्यटनाचा मूळ गाभा हा शेती आणि शेती उत्पादने उपलब्ध करून देणे असल्यामुळे कृषी पर्यटन म्हणजे ढाबा, हॉटेल, रेस्टोरंट नाही.
३) शेती: कृषी पर्यटन कद्र आराखडा:
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी कोकण विभागा करीता कमीत कमी १ एकर किंवा त्यापेक्षा जास्त व उर्वरीत महाराष्ट्राकरीता कमीत कमी २ एकर पर्यंत व त्यापेक्षा
जास्त क्षेत्र असणे आवश्यक आहे.
शेतीतील नवनविन प्रयोग हे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपयोगी ठरत असतात. आखीव रेखीव शेती, भाजीपाल्याची लागवड, खुरपणी, पिकांची काढणी, भात लागवड या कामांचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकांना घेता येतो. गाई, म्हशी, मेंढया, शेळ्या, कोंबड्या, मांजर या पाळीव प्राण्यांच्या सानिध्यात पर्यटकांना आनंद मिळतो. शेतातील कृषी पर्यटन केंद्रासाठी स्वच्छ पाणीपुरवठा असणे गरजेचे आहे. नदी, विहीर अथवा उपसा जलसिंचन शेततळे यामार्फत पाण्याची उपलब्धता असावी. बैलगाडी हे कृषी पर्यटनातील मुख्य आकर्षण आहे. आयुष्यात एकदाच बैलगाडीत बसलो आणि तेही कृषी पर्यटन केंद्रामध्ये असे असंख्य पर्यटक आहेत. आज अनेक शेतकरी नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेतीचा अवलंब करीत आहेत. कृषी पर्यटन केंद्रचालक शेतकऱ्यांची या गोष्टीचा विचार केल्यास
पर्यटकांना सकस अन्न व स्वच्छ आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल. शाश्वत शेतीकडे वाटचाल होईल.
४) पर्यटक निवास स्थान …..
कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी निवास व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या केंद्राकरिता खालील
बाबी लागू राहतील.
शेतीचे क्षेत्र खोल्याची संख्या
अ.क्र. शेतीचे क्षेत्र. खोल्यांची संख्या आकारमान
१. २ एकर पर्यंत ४ कमाल १५० चौ.फूट
२. २ ते ५ एकर. ६ कमाल. ९५० चौ. फूट
३. ५ एकरापेक्षा जास्त ८ खोल्या व १५० चौ फूट
ड्रोरमेटरी. लोकनीवास
७०% ते ८००
शासनाच्या कृषी पर्यटन धोरणानुसार आठ खोल्यापर्यंतच्या केंद्रासाठी व सुविधाच्या बांधकामासाठी नगर रचना
विभागाची परवानगीची गरज पडणार नाही. प्रत्येक खोलीला जोडून ४० चा.फ्.चे बाथरूम, शौचालय जोडून असावे.
५) भोजन व स्वयंपाकघर:
कृषी पर्यटन केंद्रातील पर्यटक निवासाजवळ किमान १५’४१०’ आकाराचे स्वयंपाकघर व २० x १५’ किमान आकाराचे भोजनकक्ष असावे. स्वयंपाकगृहात स्वच्छ आणि खेळती हवा असावी. पर्यटकांसाठी भाज्या शक्यतो शेतातोल असाव्यात. पिण्याचे पाणी शुद्ध असावे. जमल्यास water filter बसवावा. केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी वैद्यकिय तपासणी करणे गरजेचे आहे. पर्यटकांना ग्रामीण पद्धतीने जेवण, नाष्टा, चहा पाहिजे. कृषी पर्यटन केंद्रात मद्य, मादक पदार्थ, धूम्रपानास सक्त मनाई असावी.
६) कृषी पर्यटनाचे फायदे……
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती झाली आहे, शेतकऱ्यांच्या पारंपारिक शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा कृषी पर्यटन व्यवसायामुळे १०% ते
५०% शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले असल्याचे मार्टच्या पाहणी आहवालात स्पष्ट झाले आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून शेतकऱ्यांचे राहणीमान उंचवण्यास कृषी पर्यटनामुळे मदत होत आहे, कृषी पर्यटन व्यवसायात शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व प्रतिष्ठा मिळत आहे, शहरी पर्यटकांच्या संपर्कातून शेतकऱ्यांच्या विचारांच्या कक्षा वाढविणारा उपक्रम तसेच शहरी व ग्रामीण दरी कमी करणारा व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन उपक्रमाकडे पाहिले जात आहे, निसर्ग व ग्रामीण संस्कृतीचे जतन तसेच पर्यावरण संवर्धन कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जोपासले जात आहे, ग्रामीण हस्तकला, महिला बचत गटाचे उत्पादन कृषी उत्पादनाची कृषी पर्यटन केंद्रावर थेट खरेदीची संधी पर्यटकांना मिळत आहे.
७) १६ मे जागतिक कृषी पर्यटन दिन
महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ अर्थात मार्ट मागील १२ वर्षापासून १६ मे हा दिवस संयुक्त राष्ट्रासंघाच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या (UNWTO) मान्यतेने जागतिक
कृषी पर्यटन दिन साजरा करत आहे. राज्यातील कृषी पर्यटनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था यांना कृषी पर्यटन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. आतापर्यंत विशेषतः कोकणातील कृषी पर्यटनात काम करणाऱ्या कोकण भूमी प्रतिष्ठान श्री. बाळासाहेब परुळेकर, गारवा कृषी पर्यटन केंद्र
असलेली गुहागर संचालक सचिन कारेकर, मालवणचे भाऊ सांमत, ऋतुराज कृषी पर्यटन शिरवली, रत्नागिरीचे वसंत गुरव, असगोली ता. गृहगर जि. रत्नागिरीचे नित्यानंद झगडे या शेतकऱ्यांचा गौरव केला आहे.
७) कृषी पर्यटन धोरण
मागील अनेक वर्षे कृषी पर्यटन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागत होते. राज्य शासनाचे कृषी पर्यटन धोरण नसल्याने केंद्र उभारणी कर्ज योजना,.बांधकामाच्या वेगवेगळ्या परवानग्या, शासकीय कर, वीज बील दर आकारणी शेतीपूरक जोड व्यवसाय म्हणून मान्यता नसणे यामुळे या व्यवसायास गती मिळत नव्हती. मागील सात आठ वर्षापासून राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे मार्टने कृषी व पर्यटन विभाग यांच्या मान्यतेने शासनाला २७ जानेवारी २०१४ ला कृषी पर्यटन धोरण मसुदा सादर केला. या धोरण मसुदा, मागण्यावर विविध खात्याचे अभिप्राय घेऊन मार्टने वृत्तपत्र, सामाजिक माध्यमे, कृषी पर्यटन परिपात्र व सरकारकडे केलेल्या या पाठपुराव्यामुळे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सुनेत्रावहिनीनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शासनाच्या पर्यटन विभागाने दि. २८ सप्टेंबर २०२० रोजी कृषी पर्यटन धोरणास (शासन निर्णय TDS/8 प्र.क्र. ७१४ पर्यटन) मान्यता दिली आहे. याबद्दल राज्याचे त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानलेच पाहिजेत.
मंजूर धोरणानुसार शेतकऱ्यांना बँक कर्ज सहजरित्या प्राप्त होईल, तसेच वस्तू व सेवा कर, विद्युत शुल्कात लाभ होणार आहे. जलसंधारण विभागामार्फत शेततळे केंद्राना प्राधान्याने मिळणार आहे. ग्रीन हाऊस, फळबाग योजनाचे फायदे मिळतील. मुख्य म्हणजे कृषी पर्यटनाला शेती पूरक जोड व्यवसाय म्हणून मान्यता मिळाली आहे.
राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांना मूलभूत सुविधा तसेच कृषी पर्यटन केंद्रांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग, मोठ्या मोठ्या शहरात कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन प्रदर्शने तसेच सर्वच कृषी पर्यटन केंद्राचे वेब पोर्टल इत्यादी कामे राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. मुळात ज्यांनी 2008 कृषी पर्यटनातील शिखर संस्थेची स्थापना करून कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला चालना दिली त्या म्हणजे सध्याच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजित दादा पवार, त्यामुळे निश्चितच याबाबतीत सकारात्मक सरकारकडून निर्णय होतील हा विश्वास वाटतो.



