मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. महाडेश्वर यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अचानक जाण्याने शिवसेना ठाकरे गटात शोककळा पसरली आहे. मुंबई महापालिकेतील सर्वात उच्चशिक्षित नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती.
रात्री त्यांना अचानक अस्वस्थ जाणवू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. एक विनम्र आणि अभ्यासू नेत्याच्या अचानक जाण्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
दुपारी 12 नंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी येतील. अंतिम दर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल, त्यांनंतर दुपारी 4 वा. अंत्ययात्रा टीचर्स कॉलनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल.




