पुणे शहर

मलनिस्सारण प्रकल्पांमुळे नदी प्रदूषण होणार कमी : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ; खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्प्याचा पर्वती विधानसभेत समारोप

मुरलीधर मोहोळ यांचा सलग १२वा जनता दरबार नागरिकांच्या प्रतिसादात संपन्न

पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांसाठी केंद्र सरकारने ३३२ कोटी रुपयांच्या मलनिस्सारण आराखड्याला नुकतीच मंजुरी दिली असून त्यामुळे पुणे शहरातील नदी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. 

पर्वती विधानसभा मतदारसंघात सिंहगड रस्ता परिसरातील कल्पना चावला इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. यावेळी नगरविकास राज्यमंत्री आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Img 20250508 wa00011184667503723765598

मोहोळ म्हणाले, “अटल मिशन फॉर रेज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेअंतर्गत या मलनिस्सारण प्रकल्पाची एकूण किंमत १,४३७.९४ कोटी रुपये असून, त्यापैकी ५३३.८५ कोटी रुपयांचे काम आधीच मंजूर झाले आहे. त्यात नव्याने ३३२.३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला गती मिळणार आहे.”

मोहोळ पुढे म्हणाले, “या आराखड्यांतर्गत जुन्या ड्रेनेज लाईन्स बदलण्यात येणार असून जवळपास ४७२ किलोमीटर नवीन पाइपलाईन टाकण्यात येणार आहे. यासोबतच ८ नवीन मलशुद्धीकरण केंद्रे (STPs) उभारली जाणार असून त्यांची एकत्रित क्षमता २०१ एमएलडी (मिलियन लिटर प्रति दिवस) इतकी असेल.”

खडकवासला, नऱ्हे, जांभुळवाडी, नांदोशी, किरकटवाडी  पिसोळी, सणसनगर, कोंढवे धावडे, किर्कटवाडी, भिलारवाडी, सुस, म्हाळुंगे, गुजर निम्बाळकरवाडी, आणि मंगदेवाडी या गावांमध्ये या योजनेअंतर्गत कामांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती ही मोहोळ यांनी दिली.

पुणेकर नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणीतील हा मोठा टप्पा आहे. समाविष्ट गावांमध्ये स्वच्छ व शास्त्रशुद्ध मलनिस्सारण यंत्रणा उपलब्ध होणार असून, त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण !

सामान्य पुणेकरांच्या समस्या प्रश्न अडीअडचणी सुटाव्यात यासाठी मोहोळ यांनी सुरू केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन वेळा हे अभियान राबवण्यात आले आहे. पुढील महिन्यापासून या अभियानाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. नागरिकांचे प्रश्न या अभियानाद्वारे सुटत असल्याने दिवसेंदिवस या उपक्रमात अधिकाधिक पुणेकर सहभागी होताना पाहायला मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये