स्वतःच्या आनंदापेक्षा समाजाचे ऋण महत्त्वाचे ; उद्योजक संजय भोर यांच्या वाढदिवसादिवशी १२७ जणांचे रक्तदान..

शिवणे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा
पुणे : वाढदिवस म्हणजे केवळ आनंदाचा आणि शुभेच्छांचा दिवस नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधीही असू शकते, याचा आदर्श घालून देत भोर इंडस्ट्रीजचे संचालक तथा शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष, माजी स्वीकृत सभासद संजय भोर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १२७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
शिवणे येथील भोर इंडस्ट्रीजच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवनेरी ब्लड सेंटरच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. शिवणे, उत्तमनगर, वारजे, कर्वेनगर, कोथरूड तसेच पुणे जिल्ह्यातील औद्योगिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून संजय भोर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
उद्योग क्षेत्रात यशाची शिखरे गाठतानाच समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव कायम जपणारे उद्योजक म्हणून संजय भोर यांची ओळख आहे. कोरोना महामारीसारख्या कठीण काळातही त्यांनी कामगार वर्ग आणि नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत मदतीचा हात पुढे केला होता. त्यामुळेच पुणे जिल्ह्यात त्यांच्याकडे समाजाभिमुख उद्योजक म्हणून पाहिले जाते.

वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमाला प्राधान्य देत भोर यांनी सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश दिला आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाला नवजीवन मिळू शकते, ही भावना या उपक्रमामागे होती.
यावेळी संजय भोर म्हणाले, “रक्तदान हे अनमोल दान आहे. आपल्या रक्तामुळे एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. रक्ताची गरज कोणाला कधी आणि कुठे भासेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे ‘करून दान रक्ताचे, ऋण फेडू समाजाचे’ हे व्रत प्रत्येकाने अंगीकारणे गरजेचे आहे.”












