पुणे शहर

गणेश मंदिरावर कारवाई केली, आता पदपथावरच्या पालिकेच्या तसेच राजकीय अतिक्रमणांवरही हातोडा चालवा ! केदार मारणे आक्रमक

आयुक्तांना निवेदन..केदार मारणे यांच्या मागणीमुळे महापालिका प्रशासनाची कोंडी होणार!

पुणे : कर्वेनगरमधील कॅनॉल रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या महापालिकेच्या कारवाईवरून आता नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कामना वसाहत येथील मोरया मित्र मंडळाच्या श्री गणेश मंदिरावर महापालिकेने कारवाई करत बांधकाम जमीनदोस्त केले. मंडळाने या कारवाईला विरोध न करता प्रशासनाच्या नियमबद्ध कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र, आता याच कारवाईचा आधार घेत कॅनॉल रोडवरील पदापथावरील महापालिकेची, राजकीय, बचत गट आणि इतर व्यावसायिक अतिक्रमणेही हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एका मंदिरावर कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाला आता इतर अतिक्रमणांवरही हातोडा चालविण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.

मोरया मित्र मंडळाचे आधारस्तंभ केदार मारणे यांनी थेट महापालिका प्रशासनालाच समान कारवाईचे आव्हान दिले आहे. गणेश मंदिरावर कारवाई केली, मात्र अतिक्रमण हटविताना प्रशासनाने दुजाभाव करू नये. फुटपाथवर असलेली महापालिकेचीच बांधकामे, राजकीय अतिक्रमणे आणि व्यावसायिक स्टॉल यांच्यावरही तितक्याच कठोरपणे कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. यात कोणालाही अभय देऊ नये असे त्यांनी म्हंटले आहे.

Img 20261029 wa00153082406691295416280



या संदर्भात केदार मारणे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम तसेच वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता तांबे यांना निवेदन दिले आहे. प्रभाग क्रमांक ३० मधील कॅनॉल रोड आणि परिसरातील फुटपाथवरील सर्व बेकायदेशीर बांधकामे सरसकट हटवून संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मंदिरावर हातोडा चालला, मग महापालिकेच्या तसेच राजकीय अतिक्रमणांचे काय?

२३ नोव्हेंबर २०२६ रोजी कामना वसाहत येथील मोरया मित्र मंडळाच्या श्री गणेश मंदिराचे बांधकाम फुटपाथवर असल्याने महापालिका प्रशासनाने ते जमीनदोस्त केले. या नियमबद्ध कारवाईचे स्वागत करतानाच केदार मारणे यांनी प्रभागातील अन्य अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

त्यांनी निवेदनात महापालिकेचीच काही बांधकामे फुटपाथवर असल्याचा दावा केला असून, काही राजकीय बांधकामेही झाली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यामध्ये पुढील ठिकाणांचा उल्लेख केला आहे.

१. गल्ली क्रमांक ६ येथील आरोग्य कोठी.
२. महर्षी कर्वे विद्यालय चौकातील पाणीपुरवठा कोठी.
३. भारत कॉलनीतील आरोग्य कोठी (लाकेश्वर चहा सेंटरसमोर).
४. डी-मार्टच्या मागील परिसरातील पाणीपुरवठा कोठी.
५. तिरुपती नगर येथील कोठी.
६. महर्षी कर्वे शाळा आणि कर्वेनगर उड्डाणपुलाखालील कोठी.
७. अलंकार पोलीस स्टेशनजवळ, काका हलवाई स्वीटसमोरील बांधकाम.
८. मृत्यूंजय मंदिरामागील आरोग्य कोठी.

ही सर्व बांधकामे फुटपाथवर असल्याचा दावा करत, मंदिराप्रमाणेच या बांधकामांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. नागरिकांना चालण्यासाठी असलेले फुटपाथ मोकळे ठेवणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. एका ठिकाणी कारवाई करून अन्य ठिकाणची अतिक्रमणे कायम ठेवणे म्हणजे नागरिकांशी अन्याय आणि प्रशासनाकडून दुजाभाव असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

पुणे ग्रँड टूरच्या मार्गातील अतिक्रमणांचाही मुद्दा ऐरणीवर!

केदार मारणे यांनी केवळ कॅनॉल रोडपुरताच हा मुद्दा मर्यादित न ठेवता पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या मार्गावरील अतिक्रमणांचाही प्रश्न उपस्थित केला आहे.

पुणे ग्रॅण्ड टुर सायकल स्पर्धेचा मार्ग महर्षी कर्वे शाळा चौका पासुन शाहु कॉलनी पाणंद रस्ता ते राजाराम पूल मार्गे सिंहगड रस्त्यावर जाणार जीथे ह्या सायकल वळणावर आहे, तीथे महिला बचत गटाचे संकल्प म्हणून व्यावसायिक अतिक्रमण आहे ते संकल्प बचत गटाच्या आड खुप गाड्या स्टॉलचे अतिक्रमण झाले आहे म्हणून हे अतिक्रमण काढल्यास पुर्ण ३० मीटर रस्ता मोकळा होईल आणि पुणे ग्रॅण्ड टुर स्पर्धेचा अडथळा दुर होईल असे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.

Fb img 1793342454540

आता महापालिका प्रशासन कोणावर कारवाई करणार?

एका बाजूला फुटपाथवरील मंदिरावर कारवाई करून महापालिकेने अतिक्रमणविरोधी मोहिमेला सुरुवात केली आहे. मात्र, आता त्याच निकषांनुसार दुर्लक्षित केली जात असलेली महापालिकेची बांधकामे, राजकीय अतिक्रमणे आणि व्यावसायिक स्टॉल यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे.

मंदिरावर कारवाई झाली, मग इतर अतिक्रमणांना अभय का? हा सवाल उपस्थित करत केदार मारणे यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई करणार की काही ठिकाणांना अभय देणार, याकडे आता कर्वेनगरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक ३० आणि २९ अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी करत केदार मारणे यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. आता महापालिकेच्या हातोड्याचा पुढचा घाव नेमका कुठे पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये