पुणे शहरशैक्षणिक

सत्ता असो वा नसो, लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारीच खरी लोकनेता: पंकजा मुंडे

अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाच्या कार्यक्रमात प्रतिपादन

पुणे : केवळ निवडणूक जिंकून एखाद्या पदावर विराजमान होणे म्हणजे लोकनेता होणे नव्हे. लोकप्रतिनिधी पाच वर्षांसाठी निवडून येतो. मात्र, खरा लोकनेता किंवा लोकनेत्री सत्तेत असो अथवा नसो, त्याचे स्थान कायम लोकांच्या हृदयात असते. महिलांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करताना संयम, साहस, सातत्य आणि स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

Screenshot 2026 1119 1009536682663007404979299


अजिंक्य डीवाय. पाटील विद्यापीठात स्कूल ऑफ गव्हर्नन्सच्या वतीने शनिवारी आयोजित ‘लोकनेत्री’ महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. देशभरातील ४० महिला नेतृत्वकर्त्यांसाठी आयोजित या उपक्रमात मुंडे यांनी आपला राजकीय प्रवास, संघर्ष, विजय-पराभवाचे अनुभव आणि महिला नेतृत्वासमोरील आव्हाने यावर मनमोकळेपणाने भाष्य केले. यावेळी अजिंक्य डीवाय पाटील ग्रुपच्या चेअरपर्सन  पूजा पाटील, उपाध्यक्ष ईश पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन, प्रोग्राम डायरेक्टर स्नेहा मेहता, श्वेता शालिनी फाउंडेशनच्या संस्थापक श्वेता शालिनी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 


लोकप्रतिनिधी आणि लोकनेता यांच्यातील फरक स्पष्ट करताना मुंडे म्हणाल्या, “नगरसेवक, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री होणे म्हणजे लोकप्रतिनिधी होणे. मात्र, पदावरून दूर झाल्यानंतरही ज्याला जनता विसरत नाही, ज्याच्याविषयी लोकांच्या मनात आदर आणि प्रेम कायम राहते, तो खरा लोकनेता असतो.” आपल्याला सुरुवातीपासून राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. मात्र, कोणत्याही क्षेत्रात काम केले तरी नेतृत्व करायचे, अशी इच्छा होती. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासून नेतृत्वाचे गुण विकसित होत गेले. वडील गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


महिला नेतृत्वासाठी संयम, स्थिरता, साहस आणि सातत्य हे चार गुण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगताना मुंडे म्हणाल्या, सार्वजनिक जीवनात काम करताना महिलांना अनेकदा त्यांच्या दिसण्यावरून, कपड्यांवरून आणि वागण्यावरून टीकेला सामोरे जावे लागते. मात्र, अशा टीकेमुळे महिलांनी स्वतःची ओळख बदलण्याची आवश्यकता नाही. राजकारणात प्रवेश केल्यानंतरच्या एका प्रसंगाची आठवण सांगताना त्यांनी वडिलांनी दिलेला सल्ला सांगितला. राजकीय कार्यक्रमाला जाताना केवळ लोकांना दाखवण्यासाठी साडी नेसण्याऐवजी स्वतःला आरामदायी वाटणारे कपडे परिधान करावेत, असे गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले होते.महिलांनी नेतृत्व करण्यासाठी पुरुषांसारखे वागण्याची किंवा स्वतःचे नैसर्गिक व्यक्तिमत्त्व बदलण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचा उल्लेख करताना मुंडे म्हणाल्या, “महिला ही फूलही आहे आणि ठिणगीही आहे. राजकारणात येण्यासाठी महिलांनी स्वतःमधील कोमलता किंवा भावनिकता सोडण्याची गरज नाही.”
मुंडे म्हणाल्या, व्यक्तीच्या गरजा आणि महत्त्वाकांक्षा वाढत गेल्यानंतर अनेकदा तत्त्वांशी तडजोड केली जाते. व्यवस्था बदलण्याच्या उद्देशाने सार्वजनिक जीवनात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची मूल्ये बदलू नयेत, असे त्यांनी सांगितले.


आपल्या राजकीय प्रवासातील कठीण प्रसंगांची आठवण सांगताना मुंडे भावुक झाल्या. वडील गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आयुष्याला मोठे वळण मिळाले. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतर सात समर्थकांनी आत्महत्या केल्याचा प्रसंग आपल्यासाठी अधिक वेदनादायी ठरल्याचे त्यांनी सांगितले.”माझ्या पराभवामुळे लोकांनी स्वतःचे जीवन संपवावे, इतके प्रेम त्यांनी माझ्यावर केले. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी माझे आयुष्य समर्पित केले पाहिजे, हीच माझी राजकारणातील बांधिलकी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


राजकीय यश केवळ निवडणुकीतील विजय किंवा मिळालेल्या पदावर मोजले जाऊ नये. लोकांच्या मनात निर्माण झालेला विश्वास हेच नेतृत्वाचे खरे यश असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ४० महिलांपैकी एका महिलेच्या सामाजिक उपक्रमाला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाठबळ देण्याची घोषणाही त्यांनी केली.


महिला नेतृत्वासाठी त्यांनी ‘बिलीव्ह, बिगिन, बिल्ड, ब्रिज आणि बी’ हा मंत्र दिला. स्वतःवर विश्वास ठेवणे, कामाला सुरुवात करणे, त्याला संघटित स्वरूप देणे, माणसांमधील दरी दूर करणे आणि सातत्याने कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.”प्रत्येक गरिबाच्या घरात समृद्धीचा दिवा लावणे शक्य नसले, तरी त्यांच्या मनात आशेचा आणि विश्वासाचा दिवा प्रज्वलित करणे हे खऱ्या लोकनेत्याचे काम आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित महिलांना नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. महिलांनी स्वतःचा आदर करावा, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा आणि संघर्षातूनही आपली ओळख निर्माण करावी, असा संदेश  मुंडे यांनी दिला.


डॉ. राकेश कुमार जैन म्हणाले,  ‘लोकनेत्री’ हे एकेकाळी पाहिलेले स्वप्न होते. आज या प्रेरणादायी महिलांच्या माध्यमातून ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहणे, ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. ईश पाटील म्हणाल्या, प्रत्येकाला दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या दूरदृष्टीतून माझे आजोबा कै. डॉ. डी. वाय पाटील यांनी  या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. महिलांमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे देशाच्या भविष्यात थेट गुंतवणूक करणे होय. राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकणारे सक्षम महिला नेतृत्व घडवण्यात ‘लोकनेत्री’सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.” स्नेहा मेहता यांनी लोकनेत्री उपक्रमाची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये