पुणे मेट्रो मार्गिका ३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके कार्यान्वित

मेट्रोच्या ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी विशेष प्रयत्न-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
आयटी हब, व्यावसायिक केंद्रे आणि प्रमुख खरेदीच्या ठिकाणांपर्यंत पोहोचणे होणार अधिक सुलभ
पुणे : पुण्यातील मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि सुविधाजनक करण्यासाठी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’वर विशेष भर दिला जात असून, वाहनतळ सुविधा, पीएमपीएमएल बससेवेशी समन्वय आणि मेट्रोची विमानतळाशी जोडणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेवरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन नवीन स्थानके त्यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आली. दुपारी ३.३० वाजल्यापासून ही दोन्ही स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. या दोन्ही स्थानकांमुळे बालेवाडी, बाणेर परिसरातील काही भाग तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार असून, पश्चिम पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
या दोन्ही स्थानकांना २४ नोव्हेंबर २०२६ रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र आणि प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली. त्यानंतर ही स्थानके आज प्रवासी सेवेसाठी खुली करण्यात आली आहेत. या विशेष प्रसंगी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त मंजुलक्ष्मी के., मुख्य अभियंता (स्थापत्य) रिनाज पठाण, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी, मुख्य वित्त अधिकारी मितुल झवेरी, स्थानिक नगरसेवक आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुण्यातील मेट्रोचे जाळे सध्या सुमारे ५५ किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, आगामी काळात ते सुमारे १५० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने विविध मार्गांवर काम सुरू आहे. बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल होणे हा पुणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. आज मी स्वतः मेट्रोने प्रवास केला. हा अनुभव अतिशय सुखद होता.
प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला असता, त्यांनी मेट्रो सेवा आणि नव्या स्थानकांच्या प्रारंभाबद्दल समाधान व्यक्त केले. मेट्रो ही शहरांची जीवनवाहिनी बनत असून, पुणेकरांचा वाढता प्रतिसाद त्याचेच द्योतक आहे.
मेट्रो प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंतची जोडणी (लास्ट माईल कनेक्टिव्हिटी), वाहनतळ सुविधा आणि पीएमपीएमएल बससेवेशी समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे. वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शहरातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्रयत्नशील आहे. तसेच मेट्रोची विमानतळाशी जोडणी करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर अभ्यासानंतर कल्याणीनगर-विमानतळ हा मार्ग अधिक योग्य असल्याचे समोर आले असून, त्यादृष्टीने पुढील कार्यवाही सुरू आहे.”
बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल होणे, हे मेट्रो मार्गिका ३ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या स्थानकांमुळे परिसरातील रहिवासी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि नियमित प्रवाशांना अधिक वेगवान, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार मेट्रो सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध असून, अधिकाधिक नागरिकांनी दैनंदिन प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा स्वीकार करावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.”
मेट्रो मार्गिका ३ हा पीएमआरडीएच्या नियोजनबद्ध आणि शाश्वत शहरी विकासाच्या व्यापक दृष्टिकोनातील एक महत्त्वाचा भाग आहे. बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाल्यामुळे या मार्गावरील सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि सुलभता वाढणार आहे. शहराच्या सध्याच्या वाहतूकविषयक गरजा पूर्ण करण्यासोबतच भविष्यातील वाढत्या गरजांचाही विचार करून एकात्मिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर आमचा भर आहे.
बालेवाडी हायस्ट्रीट स्थानकामुळे पुण्यातील प्रमुख खाद्यसंस्कृती आणि मनोरंजन केंद्रांपैकी एक असलेल्या बालेवाडी हायस्ट्रीट येथे जाणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच परिसरातील आयटी कंपन्या, व्यावसायिक संकुले आणि कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही हे स्थानक सोयीचे ठरणार आहे. तर बालेवाडी फाटा स्थानकामुळे बालेवाडी, बाणेर आणि लगतच्या परिसरातील रहिवासी तसेच नियमित प्रवाशांना मेट्रोची अधिक सुलभ सुविधा मिळणार आहे.
पुणे मेट्रो मार्गिका ३ ही २३.३ किलोमीटर लांबीची पूर्णपणे उन्नत मेट्रो मार्गिका असून, ती हिंजवडी आयटी पार्कमधील माण ते शिवाजीनगरदरम्यान धावते. या मार्गावर एकूण २३ स्थानके आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ३५ वर्षांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या प्रकल्पाच्या उभारणी आणि संचालनाची जबाबदारी पीआयटीसीएमआरएलकडे सोपविली आहे. टाटा समूह आणि सीमेन्स यांचा या कंपनीत अनुक्रमे ७४ आणि २६ टक्के सहभाग आहे.
या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी झेंडा दाखवून मेट्रो सेवेला प्रारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



