महाराष्ट्र

गणेशोत्सवा निमित्त गणेशविद्या संदर्भातील मांडणी पुन्हा एकदा !
गणेशविद्या : देवनागरी लिपी – प्रा. अनिल गोरे

गणपतीने ज्या वर्णसंचातून महाभारत लिहिले असे मानतात त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे. त्या  संचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या संचाला देवनागरी लिपी म्हणतात. ही लिपी वेगाने तसेच उच्चारानुसार लिखाणासाठी अत्यंत सोयीची आहे.

यातील अ ते ज्ञ अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ० ते ९ अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून  होईपर्यंत उचलावी लागत नाही. या लिपीतील चिन्हे  १८ स्वर, ३३ व्यंजने व ३ संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.

५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरुपात लाखो स्वतंत्र अक्षरसमूह चिन्हे लिहिता येतात.भारतीय भाषांसाठी योजलेल्या लिप्या वगळता जगातील इतर अनेक लिप्यांमध्ये अशी संपन्नता नाही. गणपतीने म्हणजे देवाने ही लिपी नागरिकांसाठी बनविली या समजुतीने तिला देवनागरी लिपी म्हणतात.

ही समजूत कशी झाली याबाबत एक आख्यायिका प्रचलित आहे.

Img 20210818 wa0002

महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी गणपतीला पाचारण केले. गणपतीने त्यांना एक अट घातली की, व्यासांनी महाभारत इतक्या सलगपणे सांगावे की, लिहिताना खंड पडू नये. व्यासांनी ही अट मान्य करतानाच एक अपेक्षा व्यक्त केली की, गणपतीने ध्वनीवर आधारित तसेच उच्चार आणि लेखन यात संपूर्ण सुसंगती असेल अशा वर्णसंचात लेखन करावे. गणपतीने महाभारत लेखन करताना असा नवा वर्णसंच निर्माण केला. उच्चार मुखातून बाहेर पडत असले तरी उच्चाराचा संबंध  शरीरातील कोणत्या भागांशी आहे का याचा गणपतीने अगोदर वेध घेतला. वेगवेगळे ध्वनी उच्चारताना मानवी शरीरातील पाठीच्या वेगवेगळ्या मणक्यांत तसेच मुखात संवेदना जाणवतात असे गणपतीच्या लक्षात आले. प्रत्येक मणक्याशी अशा प्रकारे जोडल्या गेलेल्या प्रत्येक स्वतंत्र ध्वनीसाठी गणपतीने एक चिन्ह निर्माण केले. अशा प्रत्येक चिन्हाला एक वर्ण म्हणतात. मानवी मणक्यांची संख्या ३३ आहे म्हणूनच गणपतीने आरेखित केलेली मणक्यांशी संबंधित वर्ण चिन्हे देखील ३३ होती. या ३३ वर्णांनाच आपण सध्या व्यंजने म्हणतो. या व्यंजनांचा उच्चार होताना जीभ मुखात कोठे ना कोठे टेकते असे लक्षात आल्यामुळे व्यंजनांचे कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य असे पाच प्रकार गणपतीला आढळले.  या शिवाय काही उच्चारांचा मणक्यांशी संबंध नसून मुखाशी असलेल्या संबंधातही एक वैशिष्ट्य आहे हे गणपतीच्या लक्षात आले. या उच्चारांच्या वेळेस जीभ मुखात कोठेही टेकत नाही असे गणपतीला आढळले. अशा वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारांसाठी गणपतीने जी वेगळी चिन्हे निर्माण केली त्यांना आपण आता स्वर म्हणतो. हे स्वर १६ आहेत. गणपतीने अशा प्रकारे ३३ चिन्हे व्यंजनांसाठी आणि सोळा चिन्हे स्वरांसाठी निर्माण केली. या चिन्हांचे दृश्य रूप काळाच्या ओघात बदलत गेले. गणपतीने कल्पिलेल्या सर्व वर्णांसाठी त्यानेच आरेखित केलेल्या चिन्हांमध्ये अनेक वेळा बदल झाले आणि त्या ४९ चिन्हात पुढील काळात आणखी३ चिन्हांची भर पडून सध्या आपण वापरत असलेल्या ५२ चिन्हांच्या सध्याच्या रूपाला आपण देवनागरी लिपी म्हणतो.  वाचन आणि लेखन अधिक वेगाने होण्यासाठी गणपतीने या चिन्हांपैकी काही अर्धी आणि एक पूर्ण जोडून जोडाक्षर निर्मितीही केली. जोडाक्षर हे  देवनागरी लिपीचे महत्वाचे वैशिष्ट्य असून ये अनेक भारतीय लिप्यांमध्ये आढळते. मानवी शरीरातील भागांशी उच्चारांच्या असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे मानवी बोलणे ९९.९९ %  प्रमाणात अचूक व नेमके लिहिणे देवनागरी लिपीतून जमते.

ही लिपी खरेच देवाधिदेव गणपतीने बनविली का ? यावर आस्तिक, नास्तिकांचा वाद सुरु आहे, पण ही जगातील अत्यंत उपयुक्त लिप्यांपैकी एक महत्वाची लिपी आहे, याबाबत दुमत नाही. ही लिपी जगातील बहुतेक सर्व भाषांमधील आशय उमटवण्यासाठी वापरता येते. सुमारे दोनशे भाषांमधून त्या प्रत्येक भाषेतील दहा हजारांपेक्षा अधिक लोक ही लिपी दैनंदिन स्वरूपात वापरतात.

कोणीही केलेल्या संशोधनाची नोंद त्या संशोधकाच्या नावाने करण्याची पद्धत सध्या आहे. पूर्वी अशी पद्धत नव्हती. कोणी संशोधन केले, कविता रचली तर त्याबाबतच्या लिखित आशयातच संशोधकाचे, कवीचे नाव गुंफण्याची अथवा त्या संबंधी नामानिधान किंवा संज्ञांमध्येच संबंधिताचे नाव गुंफण्याची पद्धत होती.

शल्याने शरीर कापून त्यात दुरुस्तीची पद्धत सुरु केली, त्या पद्धतीला शल्यकर्म म्हणतात.  रुग्णांची नियोजनपूर्वक देखभाल पद्धत शुश्रुताने सुरु केली, त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात. डिझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या इंधनाला त्याचे नाव आहे. सुखकर्ता दुखहर्ता …. या आरतीत दास रामाचा वाट पाहे म्हणून रामदासांनी ओळख दिली. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, तुका म्हणे, येणे वरे ज्ञाना सुखिया झाला, केशवासी नामदेव भावे ओवाळिती, कहत कबीर सुन भाई साधू या ओळींतून जनार्दन स्वामी, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, कबीर यांनी आपले नाव गुंफले.

देवनागरी वर्णाक्षरांच्या सध्याच्या स्वरुपात ग, ण, श ही अक्षरे इतरांपेक्षा वेगळी असून त्यांच्या बाराखडीत पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे! ग, ण, श यांच्या बाराखडीत पहिल्या स्थानी सुट्टा काना असणे हाच, ही वर्णव्यवस्था गणपतीने निर्माण केल्याचा संकेत मानून या लिपीला गणेशविद्या म्हणतात.

देवनागरी लिपीत १८ स्वर, ३६ व्यंजने असून स्वरांचा मानवी मुखाशी तर व्यंजनांचा मानवी मणक्यांशी संबंध आहे. कान या मराठी शब्दाची सुरूवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे क अक्षरचिन्ह दिसते. ड, ळ  अक्षरांनी  डोळा शब्द बनतो. उघडा डोळा, भिवई, पापणी मिळून ड चा भास होतो.
दोन डोळे एकत्र पाहताना ळ चा भास होतो. झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो.  घसा तपासताना वैद्यबुवांना घ दिसतो.

मानवाला प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तूंना नावे देण्याची गरज भासली, ती नावे लिहिण्यासाठी देवनागरी अक्षरांना त्या वस्तूंचे आकार दिले असावेत. मुखाशी संबंधावरून ३६ व्यंजनांचे दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, अनुनासिक हे पाच प्रकार आहेत.  वेगवेगळी व्यंजने उच्चारताना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवतात.

व्याकरणकार पाणिनीने देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यातील हा संबंध सूचित केला आहे. कोणत्या मणक्याचा कोणत्या अक्षराशी संबंध आहे याबाबत पाणिनीने जे सुचवले त्याचा आधार घेऊन मी ते एका चित्रात दाखवले आहे. मानवी शरीराशी, मानवी जीवनाशी देवनागरी लिपीचा घनिष्ठ संबंध असल्याने मानवी उच्चारांना अचूक लेखनाची जोड देण्यास आवश्यक सोयी देवनागरी लिपीत, जोडाक्षर पद्धतीत आहेत.

कोणत्याही मानवी भाषेतील ९९.९९ टक्के शब्द या लिपीतून हुबेहूब लिहिता येत असल्याने ही लिपी जगाची भाषिक एकात्मता साधू शकेल. लेखन, उच्चारात सर्वाधिक सुसंगतीसाठी ही जगातील सर्वोत्तम लिप्यांपैकी एक आहे. देवनागरी लिपीचिन्हांत आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ, उडिया, तेलुगू , मल्याळी लिपीचिन्हांत थोडा बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्यांमध्ये लक्षणीय एकात्मता आहे !

लिपीचिन्हांतील या बदलांची कारणे भौगोलिक, राजकीय आहेत.  लिखाणासाठी भारताच्या उत्तरेत भूर्जपत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे  वापरत. भूर्जपत्राला पुरेशी उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार, अनुस्वार, चंद्र, हलन्त उपचिन्हे वर्णाक्षरांच्या वर, खाली लिहिता येत.

ताडपत्रावर उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दक्षिणी लिप्यांमध्ये ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहिणे सोयीचे होते. अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात. शत्रूला संदेश समजू नये म्हणून काही भारतीय राजांनी स्वत:ला व त्याच्या अधिकार्‍याना, प्रजाजनांना समजणारी, पण इतरांना न समजणारी भाषा, लिपी तयार केली.

देवनागरी लिपीशी बरेच साम्य आणि किरकोळ बदलाने नव्या लिप्या झाल्या. अनेक भारतीय लिप्यांतून लिहिताना कमी जागा, कमी कागद, कमी शाई वापरली जाते. कागद कमी लागल्यास जंगलतोड कमी होते. शाईत शिसे किंवा जड धातू वापरतात. शाई कमी लागल्यास शिशाचे व जड धातूंपासून होणारे प्रदूषण कमी होते.

१७७७ रु. धनादेशाने देताना रोमन लिपीसह इंग्रजीत one thousand seven hundred seventy seven only ही ३९ अक्षरे तर मराठीत सतराशे सत्त्याहत्तर फक्त ही ११ अक्षरे लागतात.

जगात रोज कोट्यवधी धनादेश देवाणघेवाण होते,  त्यात अक्षरी रक्कम तीन वेळा लिहितात, १४ ते १९ वेळा वाचतात. धनादेश भारतीय भाषांत लिहिल्यास इंग्रजीच्या तुलनेत ७० % वेळ, ७० % शाई वाचते.  व्यवहार वेगाने होतात. कार्यक्षमता वाढते. देवनागरी लिपी पर्यावरणाचा विनाश कमी करण्यासाठी उपयुक्त आहे ! देवनागरी लिपीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. या लिपीत कोणताही मजकूर कमी जागेत, कमी श्रमात लिहिता येतो म्हणून  केवळ आर्थिक व्यवहार नव्हे तर शिक्षण, संशोधन, व्यापार, सेवा उद्योग, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात ही लिपी आणि मराठी भाषा यांचा दुहेरी वापर केल्यास आर्थिक बचत, पर्यावरण रक्षण आपोआपच होईल.

देवनागरी लिपी भारतीय/जागतिक एकात्मतेचे साधन ठरेल. घरी, बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, प्रत्येक व्यवहारात ही लिपी वापरल्यास आपण अधिक सुखी, समृद्ध, आनंदी होऊ ! ही लिपी सर्व जगाला उपयुक्त असल्याने ‘गणेशविद्या’ बाबतची माहिती देशी, परदेशी लोकांना सतत दिली पाहिजे. परदेशी व्यवहारात इतर लिपीसह ही लिपी वापरवी. परदेशातून येणाऱ्या मालावर विविध भाषा, लिपीतील मजकूर असतो तसा भारतीय व्यावसायिकांनी बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, व्यवहारात, पत्रव्यवहारात, वस्तूंच्या वेष्टनावर, आवरणावर देवनागरी लिपी वापरून गणेशविद्येचा प्रसार जगभर करावा !

आणि अनेक क्षेत्रातील मूलभूत गोष्टी भारताने यापूर्वी जगाला दिल्या. जागतिकीकरणात जगाकडून काही घेताना जगाला चांगले काही देणेही अपेक्षित आहे. जगातील सर्वोत्तम लिपी जगाला देण्यासाठी ‘गणेशविद्या’ चे जागतिकीकरण करू या ! बीजगणिताचे सिद्धांत, शून्याची कल्पना, खगोल, भूमिती, आयुर्वेदिक औषधी, मुलींच्या शाळा, कुटुंबनियोजनाचे तत्त्व, स्वातंत्र्याची इच्छा, बँकेची कल्पना, न्याय्य कररचना, शेतीसुधारणा, विधवा विवाह या सामाजिक सुधारणांपासून अवकाश तंत्रज्ञान, संगणकीय ज्ञान, माहिती तंत्रज्ञान या अनेक उत्तम गोष्टी आपण जगाला दिल्या, जगाने अशा बाबतीत आपले अनुकरण केले.

जगाला उत्तमोत्तम गोष्टी देणारे सर्व भारतीय ‘गणेशविद्या’ जगभर पोचविण्याचे कार्य करतील, असा मला विश्वास वाटतो! आपण सुरुवात तर करू,  जग आपले अनुकरण करेल.

लेखक परिचय –
निवेदक :- प्रा. अनिल गोरे.
सदस्य : भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन;*
सदस्य : मराठी भाषा  संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका;*
सदस्य : महाराष्ट्र साहित्य परिषद;
सदस्य : मराठी विज्ञान परिषद;
सदस्य : महाराष्ट्र  ग्रंथोत्तेजक संस्था.
सदस्य : पुणे  जिल्हा गणित अध्यापक मंडळ.
सदस्य : अक्षर मानव.

निवेदन :- हे माहिती ज्यांच्यापर्यंत पोचेल त्यांनी गणेश मंडळ अहवाल, शैक्षणिक  व अन्य संस्था अहवाल, मासिके, पाक्षिके, वार्षिके, त्रेमासिके, अनियतकालिके, भ्रमणध्वनी संदेश, संगणकीय विरोप, सूचना फलक, पाट्या या कायदेशीर मार्गाने यातील मजकूर देशात, परदेशात कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवावा, ही वैयक्तिक विनंती !

अनिल गोरे (संपर्क क्र. : ९४२२००१६७१ )

वी–पत्ता marathikaka@gmail.com
कृपया अधिक अधिक प्रसार करा

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये