देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर साधला निशाणा..

पुणे शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
पुणे : पुणे शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेवर निशाना साधला. पुणे महापालिकेत भाजपचा भगवा व आरपीआयचा निळा झेंडा फडकणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या शहरात पाणी प्रश्नावरून राजकारण सुरू आहे, त्याचा धागा पकडत फडणवीसांनी जे पुण्याचे पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्या शिवाय राहणार नाहीत अशा शब्दात नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवरून मला विचारण्यात आले की हे शक्तिप्रदर्शन आहे का त्यावर मी सांगितलं की, कार्यकर्ते उत्साहाने आले आहेत, आम्हाला शक्तीप्रदर्शन करायचे झाल्यास शहरातील एकही मैदान पुरणार नाही. येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजप व आरपीआयचीच सत्ता येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले लोकसभेच्या बारा खासदारांचे निलंबन करण्यात आले त्यात शिवसेनेचे दोन खासदार होते. तेव्हा माफी मागायला आम्ही काय सावरकर आहोत का असे शिवसेनेचे खासदार म्हणाले होते. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्यांच्या नकाची सरही तुम्हाला येऊ शकत नाही. आम्ही ठणकावून सांगणार की आम्ही सावरकरवादी आहोत. ज्यांना भगव्याचा मान नाही. हिंदुत्व म्हणून घ्यायची लाज वाटते अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीस यांनी निशाणा साधला.
पुणेकरांच्या मनामनात भाजप आहे. या अगोदर येथील पालिका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात होती पण त्यांनी शहराच्या विकासाचे कोणतेही काम केलं नाही. भाजप सत्तेत आल्यापासून मेट्रो, पिण्याच्या पाण्याची योजना पुढील २५ वर्षाचं नियोजन करून विकास केला. हे शहर देशातील सर्वोत्तम शहर बनल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



