आंबील ओढा कथा एक-व्यथा अनेक या चर्चासत्राचे पुणे महानगर परिषदेच्या वतीने शुक्रवारी आयोजन

सर्वपक्षीय प्रतिनिधी, सामाजिक संस्था व तज्ज्ञांचा सहभाग..
पुणे : दांडेकर पूलाजवळील नैसर्गिक स्त्रोत बदलून आंबील ओढयाचे सरळीकरण कोणाच्या फायद्यासाठी आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासोबतच ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याविषयी विचारमंथनाकरीता पुणे महानगर परिषदेतर्फे आंबील ओढा कथा एक- व्यथा अनेक या चर्चासत्राचे आयोजन शुक्रवार, दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती पुणे महानगर परिषदेचे अध्यक्ष ॲड गणेश सातपुते यांनी दिली आहे.
चर्चासत्रामध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरण तज्ज्ञ, पत्रकार, आंबील ओढा परिसरातील कार्यकर्ते व स्थानिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच आंबील ओढयाविषयी आजच्या परिस्थितीची माहिती देणारी डॉक्युमेंटरी देखील दाखविण्यात येणार आहे.
पर्यावरणविषयक तज्ञ व अभ्यासक ॲड.असिम सरोदे, सारंग यादवाडकर, शाम देशपांडे, श्रीकांत गबाले, मनोज भागवत, अभिजीत घोरपडे, सौरभ मराठे हे चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत जगताप, काँग्रेसचे आबा बागुल, अरविंद शिंदे, भारतीय जनता पक्षाचे गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील आपले विचार मांडणार आहेत.

ॲड. गणेश सातपुते म्हणाले, कात्रज ते वैकुंठ स्मशानभूमीपर्यंतच्या ओढयावर कोणती बांधकामे झाली?
त्याचे दुष्परिणाम काय होणार? व्यावसायिकांनी ओढयाची रुंदी कमी करुन अतिक्रमण केल्याने पावसाळ्यात झालेली दुरावस्था आणि पावसाळ्यात ओढयाला आलेला पूर व त्यातील मनुष्य तसेच वित्तहानी याविषयी चर्चासत्रात विचारमंथन होणार आहे. आंबील ओढयाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, येथील स्थानिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यादृष्टीने पावले उचलण्याकरीता चर्चा केली जाणार आहे.






