कर्वेनगरमध्ये दुभाजकावर बसवलेल्या मावळ्याच्या पुतळ्याचे झाड पडल्याने नुकसान..

कर्वेनगर : कर्वेनगरमध्ये वनदेवी मंदिर ते डी मार्ट चौक दरम्यान दुभाजकावर महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. यातील डी मार्ट समोरील मावळ्याचे पुतळ्याचे नुकसान झाल्याचे आज सकाळी पुढे आले. झाड पडल्यामुळे पुतळ्याचा हात तुटून खाली आला होता.
ही बाब भाजपचे महेश पवळे यांना कळल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी पोहचून तुटलेला हात तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा बसवला आहे. तसेच त्या ठिकाणच्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या आहेत.
या संदर्भात आपण आज महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार असून या बसवण्यात आलेल्या मावळ्यांच्या पुतळ्यांची देखभाल व्यवस्थित रित्या केली जावी, नुकसान ग्रस्त पुतळा बदल्यात यावा किंवा त्याची दुरुस्ती करण्यात यावी, येथील मावळ्यांच्या पुतळ्यांचे पावित्र्य राखले जावे याकरिता देखभालीसाठी कायमस्वरूपी महापालिकेचा माणूस ठेवून व्यवस्था करावी अशी मागणी करणार असल्याचे महेश पवळे यांनी सांगितले आहे.









