राष्ट्रवादी-भाजप युतीवर अजित पवार म्हणाले, आशिष शेलार…

पुणे : “२०१७ ला काय झालं, तेव्हा नेते काय बोलत होते आता काय बोलत होते यापेक्षा आत्ता जनतेसमोर काय प्रश्न आहे, समस्या काय आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना लगावला आहे.
भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती होणार होती असा दावा आशिष शेलार यांनी केला होता, यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी शेलार यांना टोला हाणला. “आशिष शेलार हे मोठे नेते आहेत, त्यांच्याशी पवार साहेब थेट बोलले असतील,” असाही उपरोधिक टोला अजित पवार यांनी लगावला. अजित पवार म्हणाले की, “राजकारणात काहीही घडत असतं, अशा वेळी काही परिस्थिती निर्माण होते की लोकांना वाटणार नाही असे निर्णय व्हायला लागतात. ममता बॅनर्जी आधी भाजपचे समर्थन करत होत्या, नितीश कुमार हे कधी भाजपला समर्थन करतात कधी विरोधात असतात.”
पुढे बोलताना त्यांनी राज ठाकरेंचेही उदाहरण दिलं. “राज ठाकरे यांनी २०१९ ला भाजपवर टीका केली होती, आघाडीच्या उमेदवार यांना पूरक अशी अप्रत्यक्ष भूमिका घेतली होती. आता तर ते क्लियर क्लियर महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेत आहेत,” याकडेही त्यांनी लक्ष वेधले.







