महाराष्ट्र

आम्ही मराठीचे आग्रही…!!!


विशेष लेख : अमित बोडके, नाशिक


सध्या राज्यात एक कळीचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे रिक्षाचालक किंवा सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी मराठी सक्ती. परिवहन मंत्र्‍यांनी मराठी सक्तीची घोषणा केली आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या अमराठी रिक्षाचालकांमध्ये खळबळ माजली. मुंबईतील अनेक रिक्षा किंवा टॅक्सी चालक हे अन्य प्रांतातील आहेत. पोट भरायला आलेले आणि गेली अनेक वर्षे मुंबईत राहून मुंबईच त्यांची कर्मभूमी झालेले. आता 4 मे 2026 पासून या रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारतर्फे मराठी शिकवली जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही.

Img 20260222 wa00065926623401269940689


एक प्रकर्षाने जाणवणारा विषय असा की, एक संस्था युएसईएस (U.S.E.S) फाऊंडेशन मार्च, २०२५ पासून मुंबईच्या अंधेरी (पूर्व) परिसरात मराठी भाषा शिकवण्याचा अट्टाहास करत आहे आणि शिकवतही आहे. या संस्थेचे संस्थापक मित्र निशांत यांचं म्हणणं आहे की, ज्या राज्यात आपण राहतो तेथील मातृभाषा आपल्याला आलीच पाहिजे. यासाठी आमची संस्था कार्य करते आहे. या संस्थेला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी  नकोच आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या राजकीय मदतीशिवाय आणि हस्तक्षेपाशिवाय ही संस्था काम करत आहे. तर शिक्षक मित्र प्रमोद तांबे हे अतिशय आवडीने आणि कुठलेही मानधन न घेता मराठी हा विषय येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाने शिकवतात. विशेष म्हणजे दर शनिवारी युएसईएस (U.S.E.S) फाऊंडेशनच्या मरोळ नाका येथील कार्यालयात हे वर्ग चालवले जातात. या फाऊंडेशनचा हेतू शुद्ध आहे. परप्रांतीय जे मुंबईसह महाराष्ट्रात स्थलांतरीत झाले आहेत त्यांना मराठी भाषा यायलाच हवी. आणि त्याचसाठी ही संस्था अगदी मोफत मराठीचे वर्ग घेत आहे.

Img 20260428 wa00027788540973352482271
युएसईएस फाउंडेशनचे ‘मात्री’ या मराठी भाषेचे मोफत प्रशिक्षण वर्ग. समोर मध्यभागी संस्थापक मित्र निशांत.


ज्यांना मराठी शिकण्याची इच्छा आहे ते या संस्थेसोबत जोडले जातात आणि ज्यांना इच्छा असेल ते येथे येऊ शकतात. या संस्थेबाबत विशेष बाब अशी की, ही स्वयंसेवी संस्था असून अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. अगदी गायनाचे क्लासेस, महिलांसाठी मोफत चार चाकी आणि दुचाकी प्रशिक्षणासह विविध उपक्रम ही संस्था राबवते ते सुद्धा अगदी मोफत. युएसईएस फाऊंडेशनचा अर्थ ‘युनिवर्सल साधना फॉर इटर्नल सेवा’ थोडक्यात एक इकोसिस्टीम बनवण्यासाठी हे एक पाऊल असून त्याद्वारे गरजुंसाठी एक भक्कम आधार उभा करता येईल. संस्थेचे संस्थापक मित्र निशांत हे मूळचे महाराष्ट्रातील नाहीत, तरीही त्यांचं महाराष्ट्रावरील प्रेम हे महाराष्ट्रातल्या मातीत जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा तसूभरही कमी नाही.


युएसईएस फाऊंडेशनने जेव्हा ‘मात्री’ या त्यांच्या मराठी भाषाविषयक वर्गांबाबत काही सहकाऱ्यांकडे संकल्पना मांडली असता त्याला सर्वांनी तात्काळ सहमती दर्शवत मोठ्या उत्साहात त्यास सुरुवात केली. मित्र प्रमोद तांबे हे मोठ्या उत्साहात मराठी भाषा शिकवताना दिसतात. युएसईएस फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांनाही मराठी भाषा वर्गांना हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे मात्र, कुणालाही सक्ती केलेली नाही हे विशेष.
युएसईएस फाऊंडेशन चार पातळ्यांवर काम करते, वैयक्तिक, व्यावसायिक, आध्यात्मिक आणि सामाजिक. या चार स्तंभावर हे फाऊंडेशन उभं आहे. मित्र निशांत हे संन्यासी असून ते मोठ्या हिरीरीने फाऊंडेशनच्या प्रत्येक कामात वैयक्तिक पातळीवर लक्ष घालताना दिसतात.
युएसईएस फाऊंडेशनच्या मात्री या प्रकल्पासाठी खूप खूप शुभेच्छा, महाराष्ट्रातील अनेकांनी विशेष म्हणजे परप्रांतियांनी मराठी शिकण्यासाठी युएसईएस फाऊंडेशनकडे तातडीने जावे. आजही ही संस्था प्रसिद्धीपासून दूर आहे. ते त्यांचं काम निरंतर करत असून, लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं एवढाच त्यांचा हेतू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये