पुणे शहरराजकीय

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यातील कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा; टेम्पो भाडे व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर आमदार बापूसाहेब पठारेंचा सवाल

मुंबई: विधान भवन, मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे शहरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.

Img 20260222 wa00066780306961764459823

कचरा उचलण्यासाठी सहा महिन्यांच्या टेंडरद्वारे एका टेम्पोसाठी सुमारे १ लाख २० हजार रुपये भाडे दिले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत इतका खर्च करण्याऐवजी महानगरपालिकेने स्वतःचे टेम्पो खरेदी का करू नयेत, असा प्रश्न लक्षवेधी सूचना सत्रात मांडला.

तसेच, राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी महानगरपालिका असूनही पुण्यात सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मागील वर्षीही हा प्रश्न सभागृहात उपस्थित करूनही आवश्यक भरती झालेली नसल्याची बाब त्यांनी मांडली. दरम्यान, महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये स्वच्छतेची कामे प्रभावीपणे कशी राबवली जाणार, तसेच आवश्यक मनुष्यबळ किती कालावधीत उपलब्ध करून दिले जाणार, असा सवालही त्यांनी केला.

यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नव्याने समाविष्ट भागांमध्ये कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नसल्याचे मान्य केले. तसेच पुणे महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना ३० दिवसांच्या आत सविस्तर अहवाल व आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अहवालात कचरा संकलन व्यवस्था, गाड्यांची उपलब्धता, कचरा उचलण्याची ठिकाणे तसेच प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता यांचा समावेश असणार आहे. यासोबतच टेम्पो भाड्याबाबतची माहिती तपासून पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

“नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत व योग्य प्रकारे मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पुणे शहरातील कचरा व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर लवकरात लवकर ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत राहू,” असे मतही आमदार पठारे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये