दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार ; डोळ्याच्या शस्त्रक्रिये दरम्यान सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला असून डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. शस्त्रक्रिया दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. प्रियदर्शनी बागडे या सहा वर्षीय मुलीला डोळ्याचा तिरळापणा घालवण्यासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
19 मे ला डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी प्रियदर्शनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ऑपरेशन थेटर मध्ये नेल्यानंतर तिच्या डोळ्यात ड्रॉप सोडण्यात आला. या दरम्यान तिला अचानक रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या म्हणून पालकांना कल्पना न देता अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. अचानक तब्येत बिघडली म्हणून आम्ही तिला सीपीआर देत आहोत असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले मात्र काही वेळातच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतल्याने हे प्रकरण पोलिसांकडे गेले. पोलिसांनी मात्र शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

हे प्रकरण आता चांगलेच तापले असून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या सोशल माध्यमांवर पोस्ट करत अनेक मुद्दे उपस्थित करत रुग्णालय प्रशासनावर टीका केली आहे.
सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की.
प्रियदर्शनी बागडे या सहा वर्षाच्या चिमुरडीला डोळ्यात तिरळेपणा असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणले होते. रुग्णालयाने सांगितले की सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत मुलीला तुम्ही शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करू शकता.
ठरल्याप्रमाणे काल मुलीला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले . ऑपरेशन थिएटर मध्ये नेल्यानंतर तिच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप सोडण्यात आला अचानक मुलीला रक्ताची उलटी सुरू झाली.
पालकांना कल्पना न देता मुलीला तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. अचानक तब्येत बिघडली म्हणून आम्ही तिला सीपीआर देत आहोत असे सांगितले मात्र काहीच वेळात मुलीने प्राण सोडला.
घडला प्रकार बाहेर येऊ नये म्हणून रुग्णालय प्रशासनाने मुलीच्या आई-वडिलांना आर्थिक आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला . मात्र ससून रुग्णालयाने पोलीस तक्रारी शिवाय आम्ही शवविच्छेदनासाठी प्रेत स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर प्रकरण पोलिसांमध्ये गेले.
पण पोलिसांनी पुन्हा नवा पवित्रा घेतला शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय आम्हाला गुन्हे दाखल करता येणार नाहीत.
आता शेवटचे, शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण राखीव ठेवण्यात आले आहे. ….अखेर प्रश्न दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा आहे. हो हे तेच रुग्णालय ज्या रुग्णालयामध्ये तनिषा भिसे यांचे निधन झाले.आणि त्यानंतर दोष तनिषा भिसेचाच कसा आहे हे सांगण्यात चाकणकर बाईंपासून झाडून सगळी यंत्रणा कामाला लागली. हो हे तेच मंगेशकर रुग्णालय आहे ज्या रुग्णालयामध्ये मागच्याच महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत येऊन गेले.
एवढ्या मोठ्या दवाखान्या विरुद्ध पोलीस सहजासहजी तक्रार कशी दाखल करून घेतील ? महिला बालकल्याण मंत्री वेळ काढून मंगेशकर रुग्णालयाला याचा जाब विचारण्याचे कष्ट घेतील का ? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.



