कलाकारांनी पुण्याची संस्कृती जपली, कलाकारांना जपणे आमचे कर्तव्य – दीपक मानकर

दीवा प्रतिष्ठान व दीपकभाऊ मानकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजन
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून नाट्यगृह, चित्रमंदिर बंद असल्यामुळे मराठी कलाकारांना खूप हलाखीचे दिवस काढावे लागले आहेत, पण याच कलाकारांनी आजपर्यंत पुण्याची संस्कृती जपली, या कलाकारांना जपणे आमचे कर्तव्य यासाठी छोटीशी मदत म्हणून आणि प्रेमाची शिदोरी टिकवण्यासाठी मराठी कलाकारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले, अशी माहिती माजी उपमहापौर व नगरसेवक दीपक मानकर यांनी दिली.
नटराजच्या मूर्तीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष मेघराज राजे भोसले, पुणे जिल्हा चित्रपट कला व साहित्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा प्रिया बेर्डे, अभिनेते व दिग्दर्शक प्रविण तरडे, काका हलवाई उद्योजक अनिल गाढवे, श्री बाळासाहेब दाभेकर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक व स्वागत दीवा प्रतिष्ठान संस्थापक हर्षवर्धन मानकर यांनी तर आभार प्रदर्शन माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे यांनी केले.
अ.भा.म.नाट्य परिषद अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘ गेली २५ वर्ष या क्षेत्रात कार्य करीत आहे, पण गेली आठ महिन्यांचा हा काळ अत्यंत वाईट गेला. या काळात सर्वजण घरी असताना कलावंतांनी सर्वांना हसवत ठेवण्याचे, मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न कलाकारांच्या वतीने प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच सध्य परिस्थितीत कोणताही चित्रपट निर्माता, नाट्य निर्माता नवीन काही करण्याचे धाडस करीत नाही, त्यामुळे कलाकारांना भरारी घेण्यासाठी मदतीची गरज आहे. त्या उद्देशाने महाराष्ट्रातील १२५ संघटनांना एकत्रित करून साधारण ८ लाख कलाकारांना एक छत्राखाली आणण्याचे काम सुरू आहे त्यामुळे त्या सर्वांना मदत करणे सोपे होईल. तसेच या दिवाळी फराळ वाटपाचे कौतुक करताना, यामुळे कलाकारांची दिवाळी गोड जाईल असे म्हणाले.’
प्रिया बेर्डे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,’ कलाक्षेत्रात आम्ही आमच्या परीने मदत करत आहोत, पण कला क्षेत्राशी प्रत्यक्ष निगडित नसताना कलाकारांचे दुःख जाणून दीपक मानकर यांनी हा उपक्रम केला तर ते खऱ्या अर्थाने दर्दी आहेत. अशी बोटावर मोजता येतील इतकेच लोक आहेत की ते दुसर्यासाठी काम करतात. तसेच त्या बोलताना म्हणाल्या की महाराष्ट्र सरकारकडे चित्रपट सृष्टीला उद्योजकांचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली, त्यामुळे कलाकारांना बँकेकडून कर्ज घेण्यास फायदा होईल अशा त्या म्हणाल्या.’
अभिनेते व दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणाले की,’ अडचणीच्या काळात असतांना ही वेगळी चेहरे कलाकारांच्मा मदतीला येतात, आणि अशा मदतीमुळे कलाकारांची दिवाळी गोड जाणार आहे. तसेच त्यांनी यावेळी त्याच्या चित्रपटावेळी दीपक भाऊंनी कशी मदत केले त्याचे किस्से सांगितले. तसच ‘देऊळबंद २’ मध्ये दीपक मानकर गायकांच्या भूमिकेत दिसतील अशी घोषणा ही केली. पुढे बोलताना ते म्हणाले की रंगभूमी दिनी रंगभूमी खुली करून सरकारने कलाकारांना गिफ्टच दिले आहे. तसेच आता नाट्यगृहाचे भाडे कमी करुन प्रेक्षक नाट्यगृहात येण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी त्यांनी केली.’
माजी उपमहापौर व नगरसेवक दीपक मानकर म्हणाले की,’ सामाजिक काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे यावेळी कलाकाराच्या मदतीसाठी लॉकडाऊन काळात विविध उपक्रम केले, पण आता नाटय़गृहे उघडली असली तरी त्याच्या हाताला अजून काम नाही आणि दिव्याने दीवा लावावा म्हणून या कार्यक्रमात आज १०० मराठी कलाकारांना काका हलवाईच्या दिवाळी फराळीचे वाटप करण्यात आले. तसेच अजुन चारशे कलाकारांना दिवाळी फराळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच महापालिकेमार्फत काही मदत करता आली तर केली जाईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.’







