अदाणींच्या कंपनीत पैसा कोणाचा? राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना तीन प्रश्न

मुंबई : गौतम अदाणी त्यांच्या परदेशी भागीदारांबरोबर मिळून देशातल्या पायाभूत सुविधा विकत घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत का बसले आहेत? अदाणींच्या कंपनीत पैसा कोणाचा आहे? तो पैसा अदाणींचा आहे की आणखी कोणाचा आहे? जर तो अदाणींचा नसेल तर मग तो नेमका कोणी गुंतवला आहे? याची उत्तरं मिळाली पाहिजेत, असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल होताच राहुल गांधी यांनी ग्रँड हयात या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, जगभरातील वर्तमानपत्रं अदाणी प्रकरणावर जे काही प्रसिद्ध करत आहेत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यावेळी राहुल गाधी यांनी तीन आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांची कात्रणं दाखवली आणि त्यामध्ये केलेले दावे वाचून दाखवले.

राहुल गांधी म्हणाले, अदाणी यांच्या कंपनीच्या माध्यमातून एक बिलियन डॉलर्स भारतातून वेगवेगळ्या देशात गेले आणि ते वेगवेगळ्या मार्गाने परत आले. त्या पैशांचा वापर करून अदाणी यांनी त्यांच्या शेअर्सच्या किंमतीत फेरफार केला. त्यातून त्यांना जो फायदा झाला, त्याच फायद्यातून ते आता देशात विमानतळं, बंदरं खरेदी करत आहेत. देशातल्या पायाभूत सुविधा ते खरेदी करत आहेत. आत्ताच इथे धारावीत त्यांना मोठा प्रकल्प मिळाला आहे.



अदाणी हे त्यांच्या परदेशी भागीदारांबरोबर मिळून देशातल्या संस्था, पायाभूत सुविधा विकत घेत असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत का बसले आहेत? ते याप्रकरणी काहीच का करत नाहीत? या वर्तमानपत्रांनी पंतप्रधान मोदींवर संशय व्यक्त केला आहे. अदाणींच्या कंपनीत पैसा कोणाचा आहे? तो पैसा अदाणींचा आहे की आणखी कोणाचा आहे? जर तो अदाणींचा नसेल तर मग तो नेमका कोणी गुंतवला आहे? याची उत्तरं मिळाली पाहिजेत.



आपल्या देशातल्या ज्या तपास यंत्रणा आहेत, त्या स्वस्थ का बसल्या आहेत? सीबीआय, ईडीसारख्या संस्था अदाणी प्रकरणाचा तपास का करत नाहीत? या संस्था अदाणी यांची चौकशी का करत नाहीत? असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केले.



राहुल गांधी म्हणाले, या सगळ्या कामात गौतम अदाणी यांचा भाऊ विनोद अदाणी हा मास्टरमाईंड आहे. त्यांचे दोन भागीदार आहेत. यापैकी एक म्हणजे नसमी अली शबान अली आणि दुसरा चांग चुंग लींग हा एक चिनी नागरिक आहे. एकीकडे गौतम अदाणी हे या परदेशी व्यावसायिकाबरोबर मिळून भारतातल्या संस्था, विमानतळं, बंदरं आणि पायाभूत सुविधा विकत घेत आहेत, भारतातल्या शेअर बाजाराची दिशाभूल करत आहेत. दुसऱ्या बाजूला ते चिनी व्यावसायिकाबरोबर भागीदारी करत आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. कारण अदाणी यांची कंपनी देशाच्या संरक्षण विभागात, बंदरांच्या क्षेत्रात काम करत आहे.
राहुल गांधी यांनी यावेळी तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, मागे सेबीद्वारे गौतम अदाणी यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली. सेबीच्या ज्या अधिकाऱ्याने अदाणी यांना क्लीन चिट दिली, तोच आता गौतम अदाणी यांच्या एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचा संचालक झाला आहे. हे सगळं त्यांचं जाळं आहे. हे सगळेजण मिळून देशाची फसवणूक करत आहेत. देशाची संपत्ती विकत घेत आहेत, पंतप्रधान मोदी मात्र यावर गप्प आहेत. ते या प्रकरणी शांत का बसले आहेत? सीबीआय, ईडीसारख्या संस्था स्वस्थ का बसल्या आहेत? अदाणी प्रकरणाचा तपास अथवा त्यांची साधी चौकशीसुद्धा का केली जात नाही?



