पुणे शहरात या भागात फटाके फोडण्यास बंदी! महापालिकेने केली यादीच जाहीर…

पुणे : दिवाळीच्या काळात वायू आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाची पावले उचलली आहेत. दिवाळीत दरवर्षी ध्वनी तसेच वायू प्रदूषण होते. नागरिक मोठ्या आवाजातील फटाके वाजविण्याबरोबरच आतषबाजी करतात यामुळे हवेचे प्रदूषण होते.

यावर महापालिका प्रशासनाने निर्बंध घातले आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक, पदपथ, उद्याने, गच्ची अशा ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई केली आहे. याकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. यासाठी पोलीस, अग्निशमन दल, सार्वजनिक स्वच्छता उल्लंघन नियमावली यांचा आधार घेत कारवाई केली जाणार आहे.



मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ही सूचना प्रसिद्ध केली. ध्वनी आणि वायू प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री व वापरावर मनाई असल्याचे महापालिकेने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.



शहरातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आणि अन्य अधिसूचित शांतता क्षेत्रांच्या परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका आणि उत्सवांमध्ये ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. दिवाळीच्या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यांवर तसेच रुग्णालयांच्या जवळच अनेकदा फटाके फोडण्यात येतात. याचा त्रास नागरिकांना होतो. मोठ्या आवाजातील फटाक्यांमुळे कानाला त्रास होतो. कानठळ्या बसतात. अनेकदा तर ऐकण्यास देखील कमी येण्यास सुरवात होते. हे टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.



फटाक्यांमधून बाहेर पडणारे विषारी वायू आणि मोठ्या आवाजामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे सण आणि उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करावेत आणि फटाक्यांचा वापर टाळावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे. जे नागरिक महापालिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करताना आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही महापालिका आयुक्त राम यांनी दिला आहे.



दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू प्रदूषणासंदर्भात तक्रार करण्यासाठी महापालिकेने ०२०-२५५०१२६९ आणि ०२०-२५५०८८०० हे दूरध्वनी क्रमांक, तर १८००१०३०२२२ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. पुणे शहर प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेडून करण्यात आले आहे.






















































